Translate

29 December 2008

मी... जुळत नाही.....!!

कळते सारे....
वळते थोडे..
सुटत नाही...
अश्रूंचे कोडे....


रचते सारे....
तुटते काही....
कोसळताना....
आवाज नाही...


हासू ओठात...
रडत नाही...
डोळे तेवढे...
ईमानी नाही...


विझू म्हणता..
सुखाची आशा...
्चढत राही...
दु:खाची नशा....


उरते थोडी....
तुटत जाई...
गोळा करता....
जुळत नाही...

मी... जुळत नाही.....!!



----चैताली.

22 December 2008

आहे का काही उपाय....

नेहमीच तर वागवतेय.....
अलिप्तपणाच्या भावनांचे जोखड.....
उधाणून आलेल्या भावनाही माझ्या नाहीत...
असं वाटावं इतपत....
विस्तारलेली वरकड वेदनाच परत जमा होतेय...
हिरव्या डोहावर जम्लेल्या फेसासारखी....
वेदनाही अश्या बेतानं रक्तातून उधळतात ...
विस्फारलेल्या धमन्याही फुटत नाहीत....
माझं "सगळ्यांत" असूनही कशातच नसणं...
कधी-कधी अप्रूप वाटतं....अदम्य वेदनेचं लोण सांभाळताना....
आसपास काहीच नसलेल्या थंडगार काळ्या कातळावर पहूडल्यासारखं वाटत रहातं मग....

दरवाजे खिडक्या टक्क माझ्याकडे बघत असतात...
अन मी मात्र अजून आत आत.....!!
जगण्याच्या गाठोड्यातले काही क्षण....
शिल्लक आहेत बहुधा माझे....
त्याशिवाय सुटका नाही....
हिम्मतही नाही माझी ....
आत-खोल काय दडलंय ते बघण्याची....
भिती वाटते....मी "माझी" न राहण्याची....
मी जर माझीच नाही....तर कोणाची कोण???
आहे का काही उपाय....ह्या असलया...
कोरडेठक्कपणावर.....!!!




-----चैताली.

26 November 2008

"गाणारं झाड.....!!!"

तसा खिडकीतला गुलमोहोर नेहमीच बोलतो माझ्याशी.....
पण आज जरा जास्तच जवळिक साधत म्हणाला....
"काय गं.....काय शोधतेस....????"

"काही नाही रे.......तेच नेहमीचं....!!
त्याच्या माझ्यातले काही क्शण......
हे मात्र त्याला सांगू नकोस....."

तो त्याच्या इवल्या-इवल्या पानांनी डेरेदार हासला.....
तरीही मला जरा उदासच भासला......

म्हणाला.....
"तु काय नी मी काय....
गेलेल्या ऋतूतच अडकून पडतो.....
मला माझ्या झडलेल्या पानांचं वैषम्य.....
तर तूला ्गत्क्शणांचं....!!

जरा पुढे होवून बघूयात ना.....
फूलोरा फूलणार ....तूझ्या जीवनात...
अन मीही पूढच्या जन्मी असेल कदाचीत....
गाणारं झाड.....!!!"


----चैताली.

22 November 2008

हास्याची का मखलाशी....

का उगा डोळे भरून येती....
हास्याची का मखलाशी....
उन्हावला जीव आता....
उभी सावलीत कशीबशी....!!

कोण गं हा खटाटोप सारा
जगणं दाखवण्याचा....
आंजारून गोंजारून...
पून्हा आभाळ सावरण्याचा....!!

ताटकळत ह्या राही उभ्या...
माझ्या ऐकून कहाण्या...
राती प्रहररेषेला....
सुस्कारती चित्तरचांदण्या....!!

नको मोहोर...नको बहर...
पानगळीच्या साथीला....
घालून ह्या येरझारा....
आज ऋतू सारा खंतावला...!!

कुठे कुठेच रमेना आज....
भ्रमावल्या खूळ्या आशा.....
गमतील कधी मला....
विद्ध पंखांच्या नि:संग भाषा.....!!

का उगा डोळे भरून येती....
हास्याची का मखलाशी....!!!


-----चैताली.

21 November 2008

का .................!!!

घोंगावणारे वादळ आसरा शोधते..
का निर्बंध आभाळ कासरा शोधते??

खिडकीच माझी बंद....एकसंध....
का कोन नसलेली चौकट सांधते??

वाऱ्यात तु.....स्तब्ध ताऱ्यात तु..
का वाऱ्यावरले मी श्वास बांधते??

वेड्या गाण्यातले पाणी संथ...नितळ...
का तप्त थेंब तहानला प्राशते??

कस्तुरनयनी हरणांना जीवनाची तहान...
का जीवघेणी परत वहिवाट जोखते??

चाफ्याने करू नये सुगंधी गुर्मी...
का गळणाऱ्या पानांवर रंग हिरवा गोंदिते???

कधी येणार वळवाच्या पावसाला मातीचा मंत्र...
का उगा सुस्साट पाण्यात सूर मारते??

त्या कट्टरकाळ्या फत्तराला शेंदूर फासते...
का तूझ्या नसून असण्यावर मी जगते??



-----चैताली.

17 November 2008

अस्सा हा चकवा...... कस्सा गं फसवा....
बाई... मी नाहीच भुलणार!

अस्सं हे जंजाळ......शब्दबंबाळ.....
अं....हं! मी नाहीच गुंतणार!

अश्शी ही रात........कस्सा गं घात......
नाही! मी नाहीच फुलणार!

अस्सा हा पाऊस........ कस्सा गं साहू?
च्चं! मी नाहीच भिजणार.....

अश्शी ही लाट........ कश्शी गं भरती......
....नाहीच सरणार!

अस्सा हा तकवा....... कस्सा गं गारवा.....
चल! नाही मोहरणार!

अस्सा गं बोलका.......... मनकवडा......
आत्ता कुठे जावू....... कश्शी गं लपणार!!!!



------- चैताली.

विचारांची जिवाश्म.....!!!

विचारांचे डोंगर पोखरून..... काही मिळालं नाही.....
कोण तु......कोण मी ......कोण कोणाला बांधील?
छे! अव्यक्ताची भिल्लं पोरं.....जीवाची काहिली..... पाडतात खिंडारं....
त्यातून पडते फक्त माती..... ती ही भुसभूशीत....!
हे विवेचन आहे की विवंचना...... की फक्त मानसिक संरचना.....
हा शोध कुणाचा.....तुझ्यातला माझा...की माझ्यातला तुझा?
खेळ्तोय आपण ब्लाईंड-गेम..... तीन पत्ता......
ही लपाछपी ....... की पाठशिवणी ...... पकडलं गेलो तरी....
राज्यं आपल्यावरंच...!!!
मग आटापिटा जिवाचा..... खटाटोप डाव जिंकण्याचा.....
मांडलेली गृहितकं पण फसतात.... मग दोन थेंब आसवं.....
बाकी सारं नगण्य......!!!
ही भुपाळी आहे की भैरवी...
सुरुवात आहे की...... न पेरताच........ रुजवात....
हा माझा हस्तक्षेप..... की तुझा वरदहस्त....?
धडपड...... चाचपड...... मिळते फक्त अधमर......!!
काही वर्षांनी सापडतील ......
तुझ्या-माझ्या विचारांची..... गुंतलेली जिवाश्म...... अजस्त्र!!!!
हे काय आहे अशारीर...... सदोदित......
डोकं जातंय भंजाळून ......
आणि मग परत शोधच होतोय सारखा..... अधोरेखित.....!!!!!


------ चैताली.

14 November 2008

तोपर्यंत मी आलेच.....!!!

मला नेहमीच असं वाटतं....
माझ्या भोवतालचा अंधार....तूझ्या पायरवाने दूर सारशील....
तूझे सापेक्ष आक्षेप....माझ्यात उतरतील न उतरतील....
पण तूझं आरसपानी मन माझ्या जळावर डचमळत राहील.....
नुकतेच व्यालेले माझे शब्द....तूला भाबडलळा लावतील...
उन्हाचा चटका बसल्यागत तु हात असोशीने मागे घेशील...
पण तूला पुन्हा लगडतील.... माझी प्रकाशवलयं....!!
सारखं हटकू नकोस माझ्या पापण्यांच्या विभ्रमाला...
नाहीतर माझे हासू....उंबराची फूलं बनून तूझ्या स्वप्नी येतील....

माझ्या ओठांच्या (इमानी) कमानी...भुवयांची महिरप...
पापण्यांचे तोरण...विखरून ठेव....तूझ्या तप्त हस्तरेषांवर....
विघटन होणारा अंधार पुन:र्जिवित होण्याच्या आत....
सावल्यांवर लक्ष केंद्रित कर....
अन कवडश्यांवर नाचणारे रज:कण....पापण्यांवर गोळा कर.....
त्यांची सोनेरी आभा (आभास) कल्पोकल्पित कपोलांवर पखरत रहा....
अन हो मोकळा एकदाचा....
प्रकाशाच्या सावलीच्या ऋणातून....
तोपर्यंत मी आलेच.....
माझे झपूर्झा घालणारे....
अश्रू.....निचरून.....!!


-----चैताली.

12 November 2008

आमचे ्गीत ऐका.....

http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=54588914

[please copy-pest this link in your explorer's address bar.]
आमचे ्गीत ऐका......" कवितांचा गाव" ह्या कम्म्युनिटीचे गीत......

अभिवाचन आणि काव्यलेखन: चैताली आहेर.
गीतलेखन: स्वामीजी,अनुराधा म्हापणकर,प्राजक्ता खाडीलकर,चैताली आहेर,अनिल भारतीयन आणि Dr.राहूल देशपांडे.
संगीत: रोहित नागभीडे.
संगीत संयोजन/तालवाद्ये: आमोद कुलकर्णी.
बासरी : संदीप कुलकर्णी. व्ह्याब्रोफ़ोन आणि कीबोर्ड : निखिल महामुनी
कलाकार : अनुराधा कुबेर, बाळासाहेब शिंदे, चैताली आहेर.
आभारी आहे.

11 November 2008

एकटी मी....एकटी मी.....

एकट्या रातीनं...
चंद्राच्या साथीनं.....
चालत मी राहते...
माझी एकलीच वाट....
सांगते वाऱ्याला...
नभीच्या ताऱ्याला...
दे ना रे.....साथ....
एकटी मी...एकटी मी....॥१॥


इतक्या घाईनं...
धूक्याच्या साथीनं...
वेगळी मी वाहते....
हि असली आडवाट....
सांगते वाऱ्याला....
नभीच्या ताऱ्याला....
दे ना रे......साथ....
एकटी मी..... एकटी मी....॥२॥

कोवळ्या गाभ्यानं....
रानाच्या साथीनं...
घुमत मी राहते....
अवघड अस्सा घाट....
सांगते वाऱ्याला....
नभीच्या ताऱ्याला...
दे ना रे ......साथ....
एकटी मी....एकटी मी.....॥३॥



-----चैताली.

10 November 2008

अमावस्येच्या अंधाऱ्या रातीची घुसमट..

अमावस्येच्या अंधाऱ्या रातीची घुसमट..
काल ऐकली मी...
काय नव्हते त्यात...
सळसळ..थरथर..घालमेल..
तडफडीला,फडफडीला आवाज नव्हता त्या...
फक्त होती गहिरी खोली..... गुदमरून अंधारलेली...
मला माहित होतं....असंच असतं...
अशा रातीशी जास्त बोलणं रास्त नसतं...
पण तिलाही वाटत असेल ल्यावंसं..... चांदणं...
दुखत असेल असं..दर पंधरवड्याला...वांझोटं येणं....!!
उगाच फिरत बसते...मग ती अत्रुप्त आत्म्यांबरोबर...
स्मशानात बसून गप्पा मारते.... थडग्यांशी..
वेळ सरत नाही म्हणून...
खापरं गोळा करते फुटक्या मडक्यांची...
रस्ते सुद्धा साथ देत नाहीत तीला...
पडून असतात निपचित...तिमिरांध...!!
धावत सुटते मग ती अथपासून..इतिपर्यंत...
दिसतात मला तिचे अश्रू.... कट्टरकाळे अंधारथेंब...
बरं होईल..सापडली तीला जर एखादी...चंद्रशलाका..
साथीला राहील मग प्रकाश...चिरका...
बधिरलेला का होईना...!!!



---चैताली.

08 November 2008

अंधार-गुहा...........

अंधारवाटा जास्त पाजळू नये मशालींनी....
मग प्रकाशाच्या सावल्या भय दाखवतात े...
मरणाचे विषाणू पाळू नये....जगणाऱ्यांनी.....
मग आतले आवाज....वारतात......
शब्दांची प्रमेय मांडू नये भाषांनी.....
उगा मग संवेदना हरवतात.....
तिमिर-अस्त्र.... शुभ्र वस्त्र....
जपून ठेवावीत.....आत्मग्लानीपासून....
नाहीतर लपलेल्या अंधार-गुहा मनात विहारतात....


छिन्न-विछिन्न प्रश्न विचारू नये.....गरूडपंखांनी.....
उगाच मग आभाळाच्या पोकळ्या.....
चोची वासतात...........!!!


----चैताली.

04 November 2008

बोल ना..बोल ना...!!!

व्याकूळले मन..
झाकोळले नैन..
बाभूळले चैन..
बोल ना....


वादळले घन..
वेल्हाळले क्षण..
धुंदावले..."पण’..
बोल ना....


खंतावले रान..
पिसाटले भान..
विरहले प्राण..
बोल ना....


आसावले ओठ..
प्यासावले घोट..
थरारते ज्योत..
बोल ना....

बोल ना..बोल ना...!!!

---चैताली.

02 November 2008

...संवादिता...!

काय रे!!! ओळखलंस का???
तोल गेला आज विखुरली....
तीच रे मी धुंदवेडी......इच्छिता.....!


अशी काय हसतेस? वेगळीच दिसतेस..!
सुर हरवले....आज बावरी......
तीच रे मी भावगहिरी...खळाळिता....!


काय होतीस? कशी रया गेली!
वाया जाणं चांगलं रे...आज फक्त साचली...
तीच रे मी मानिनी......शब्दगर्विता....!


लिहितेस की नाही....दुसरं काय करशील??
स्पष्टीकरण देवू? हं... संदर्भच नाही....
तीच रे मी भाषामाधुरी..... नवनीता....!

अगं असा धीर सोडू नकोस..... चळू नकोस!
बरीच पुटं चढली..... आज झाकोळली...
तीच रे मी तेजस्विनी...संवादिता...!

नाही...नाही...अशी गळू नकोस...स्वत:पासून पळू नकोस..!!
गुंतलेल्या शब्दांत रुतली....रक्ताळली...
तीच रे मी हृदयभेदिनी....नभमल्लिका....!


बहुतेक....बहुतेक.... तीच मी ती.....



-----चैताली.

तूझ्या चौकबंद देवळीत...

तु रहा बसून तूझ्या चौकबंद देवळीत...
तूझ्याच दुनियेची तूला दिवाभीत...
दिवा लावावा आम्हीच...द्यावा उसना प्रकाश...
घातलेल्या सादेला....देशील प्रतीसाद....??
कुठवर पाहावी तूझ्या जागण्याची वाट...
दिवसाच्या कपाळी आठ्या..... प्रश्नांकीत रात.....!!


दिवे लावून बसले सारे....सारे मखर सजले....
धुंदावले सारे..... मी नाही फसले....
पाठ करून तूझ्याकडे..... एकटीच मी उभी...
आहेच मी जागी ....जरी गुंगले सारे.....!!


अशी जाणार नाही....डोई प्रश्नांचे बोचके...
खोलता गाठ...आरोप काही....अन सवाल रडके....
निखाऱ्यागत मन....उष्माळ वाफ....
काळजाला काजळी.... मी जळते चरचर.....
किती केले रिते तरी...भरले तिमिर-चषक....


नेहमीचीच सवाली.....मी तरी कोण....
अस्सा चेतला जीव.... मागतो....
चंदनसहाण......!!!




----- चैताली.

26 October 2008

अधांतरी.....!!!

तूझ्या विचारांचे पक्षी...
आज परत आंगणी येवून गेले.....
सतरंगी एक पीस तूझे मजपाशी राहिले....
वेळ लागतो रे सारं-सारं गुंफण्या....
उत्तर मागूच नये वांझोट्या प्रश्नांना....
असणारी फुलं जपावी...
दूर ठेव माझ्यासारख्या काटेरी क्षणांना...
तुझ्यासमोर आहे अजून...
पाकळ्यांचा रस्ता.....
किती सांभाळशील स्वप्नांच्या भासाला....
साहून साहावे मी किती....
जप मात्र माझी वेडी गाणी.......
वाहते जड.. स्तब्ध वारा पाठंगूळी.......
काय देणार रे तूला....मीच जगते...
अधांतरी.....!!!


-----चैताली.

पाण्याकाठी........

एक झाड पाण्याकाठी
खोल त्या पाण्यात पाही
उगाचच ते लवते...
पानी त्याच्या काही नाही....

एक घर पाण्याकाठी...
एकली खिडकी त्याची...
मोजी स्व:ताचेच वासे...
दारी त्याच्या काही नाही...

एक पक्षी पाण्याकाठी
पंख फक्त त्याच्या भाळी
उगा भरतो उडडाणे...
चोची त्याच्या काही नाही....

एक मुर्ती पाण्याकाठी...
पथिकाची वाट पाही...
आतूनच ती भंगते....
शेंदूर हा फिक्का होई..

एक वेडी पाण्याकाठी....
निश्चल बसते अशी...
स्व:ताशी ती बडबडे....
शब्द तीचे कोणी नाही....



--------चैताली.

24 October 2008

ही श्वासांची पावरी....

सुगंधाच्या लेवून लाटा
अश्या बेभान रे वाटा
कोण हा आला बाई...

श्वास बहकले माझे ....
मी राहिले ना माझी...

लाजऱ्या नजरेच्या काठा....
सांजा धुंदावल्या माझ्या....
ही श्वासांची पावरी....

पाय थिरकले माझे...
मी राहिले ना माझी.....

साऱ्या नजरेच्याच बाता.....
त्याच गाथा,त्याच राता....
काय हा सांगू पाही....

नैन बिथरले माझे.....
मी राहिले ना माझी....



-----चैताली.

वेंधळी... धांदल...

ये ना तु सख्या...


भिजताना...
टप्पोर थेंबात...
नि:शब्द तुझ्यात...
बोलताना...


हासताना...
मध्धाळ उगाच...
रोमांच हळूच ...
लाजताना...


भिनताना...
वेल्हाळ श्वासात...
गंधाळ वाऱ्यात...
फुलताना...

श्श्श्श....!!
जपताना...
गुपित मनात ...
बाई...बाई...!!
वेंधळी... धांदल...
चालताना...!!



----चैताली.

22 October 2008

..माझा कवितांचा गाव...

स्वप्नांच्या वळचणीला....माझा कवितांचा गाव...
पंखमिटला रावा जणू....वेड्या आभाळात...
आहे तिथे...सतरंगी अंबर....नभांचं झुंबर......
चंद्राच्या साथीला .....चांदण्यांची धावपळ.....!!

येशील माझ्या गावात...???
सापडतील तूला.... फूलांवीना फुलपाखरं....
लाजरं-कोवळं....गवत हासरं....!!
शब्दांची रांगोळी....कवितांचं सारवण....
ओल्या मनानं शिंपते....माझ्या गावचं आंगण....
सांभाळ हं...!! बहकशील नशील्या वाटांवर....
वेड्या स्वप्नांच्या राहूट्य़ा.... वळणावळणावर....

येताना जरा घेवून ये....
पिठूर चांदणं.... पहाटतारा...
्स्वप्नांची पखाल.....रानात माझ्या....
दे हलका हेलकावा..... नाजूक दवाला....
शब्द सांडावा तु असा...
अन मी वेचाव्या कविता....
मी वेचाव्या कविता....

[this poem is very close to my heart.....]


----- चैताली.

02 October 2008

का अशी मी...माझ्यात दंग...

का अशी मी...माझ्यात दंग...
बावरी पहाट माझी....अबोलीच सांज...
हासू कशी.....आसू किती....
नको साद घालू..... मी वाटेतली भूल.....


ढळत्या रातीत माझी...सोनभरली सकाळ...
शहारल्या पापणीत...मोहरली नव्हाळ...
वाहू किती.... साहू कशी... ......
नको साद घालू.... मी चांदण्यांची भूल...
का अशी मी....


मोहरल्या बनात माझी....पानहिरवी बहार...
उमलत्या कळीत...गंधाचा कहर...
सांगू कशी...लपवू किती....
नको साद घालू..... मी रानातली हूल....
का अशी मी...

का अशी मी....माझ्यात दंग....
बावरी पहाट माझी....अबोली सांज....



-----चैताली.

30 September 2008

अश्रांत कहाण्या....!!!

प्रत्येकवेळी असंच होतं......
नादभरल्या डोळ्यांनी काही सांगायला जावं.....
अन्‌ तु शब्दांची किंतानं ओढून बसावं.....
मी उभं रहावं स्तब्ध झाडाप्रमाणं........
आणि तु मूळा-मूळांनी माझ्यात पसरावं....
मी फांद्या मागाव्या उसन्या...
तु नुसतं पानात हसावं...
मी श्वासांच्या कंपनतारांवर वाळत घालावं जगणं....
त्याचवेळी तूझं आयुष्याला बोलावणं....

असंच का होतं....सारखं-सारखं....
भिंगारला जीव श्रांत करून मी बसावं.....
अन्‌ तु आणावी परत स्वप्नांची लव्हाळं.....
बोलले नाही ओठांनी शहाण्या...
समजून घे ना....
उपशमल्या जीवाच्या....
अश्रांत कहाण्या....!!!


------चैताली.

26 September 2008

"गप्प-गप्प का......"

बरं झालं.......
माझ्या आभाळाला गेलेला तडा तूला दिसलाच नाही ते......
पण बघ.....सावर मला आधीच....
सोपं नाहि रे....नभांच्या तुटक्या रेषांवरून चालणं......
चांदण्या बोचतात....
आकाशाचे कोपरेे रूुततात.....
अश्या वेळी क्षितिजंही साथीला नसतात....
इंद्रधनुष्य तरी किती दिवस तोलणार आकाश....

म्हणून म्हणाले....बरं झालं....
माझ्या आभाळाला गेलेला तडा तु बघितलाच नाही ते....
नाहीतर म्हणशील मग.....
"गप्प-गप्प का......
एवढं काय आकाश कोसळलंय........!!"



------चैताली.

24 September 2008

ठाव माझा इथे नाही.....

का मी अशी....विसाव्याला....
शोधे उन्हाची सावली....
वरपांगी खेळ माझा
रंगमंची मी बाहूली

अशीच रे स्वप्नं माझी
असंच का रे जगणं
सारं सारं खोटं खोटं
माझं उसनं हासणं

क्षितिजावर मारते
वेड्या स्वप्नांच्या रेघोट्या
ठाव माझा इथे नाही
ह्या तर अंधूक रेषा

ठरलेल्याच आहे रे
माझ्या वाऱ्यातल्या दिशा
आलास तु अवचित
जरा जरा डहूळल्या

कल्पित श्वासांच्या ताना
बेगडीच वास्तवाच्या
मीच विसरे सारखी
स्वप्नं जगता जगता...

वाटे जाउ दुरवर
पल्याड रे क्षितिजाच्या
सारे राहतात जिथे
तिथे तूच अडकावा

तूही तिथे अडकावा...????


----चैताली.

09 August 2008

तूझ्या माझ्या गं घरात...

आई.....

तूझ्या माझ्या गं घरात...
त्या आपल्या अंगणात...
फुलं प्राजक्ताची सारी...
मी गं दंग वेचण्यात ...


साद घातलीस मला...
गोड तूझ्या आवाजात...
आले धावत-पळत...
उधळे रांगोळी रंग....


परत घाल ना आई
तशीच साद गं आज..
आंगणी बहरला का..
तो पारिजात परत...

तूझ्या डोळ्यातले दु:ख...
माझ्या पदरात घाल...
नको सांडूस आसू...
माझ्या नयनी तु हास...



----चैताली.

मोजदाद .................!!!

मोजदाद .................!!!

आजकाल आठवणींना नाही जास्त छेडत ..
कारण मग त्या तुझ्याशिवाय दुसरं नाहीच बोलत..
तुझ्याशी बोलताना राहाणं तटस्थ...
अवघड आहे मनातली वादळं..आंदोलनं अशी लपवणं...
कविता तरी सुचावी ना मग छानशी...
तर तीही येते रडत-खडत...
तुझंच नाव पांघरत...
आणि फक्त विचार उरतात..
"आपली भेट" स्वप्न तर नाही ना..असं कूजबुजतात..
किती दिवस झालेत..डोळ्यांत बघितलंय का माझ्या..खोल..
ऐकलेस का मी न बोललेले बोल...
तुच म्हणाला होतास ...
नजर लागते विश्वासाच्या नात्याला... जगाची......
तसंच काहीसं झालंय का...
कारण आजकाल तुही हातचं राखून बोलतोस....
शब्द न शब्द तोलतोस...
मलाही इतरांत मोजतोस....??
अशी मोजदाद करु नये शब्दांची अन....
माणसांचीही...!!


---चैताली.

06 August 2008

रात उमलत जाते....

पाकळ्यात अंधाराच्या
रात उमलत जाते....
डोळा अंधार झालर
काहूरते....!

उगा आणतो वारा
गीत दवाळ क्षणांचे....
अंधारगच्च जमीन
स्वप्नाळते....!

पहाटेच्या त्या वाऱ्याला
सांजचाहूल लागते....
शुक्राची चांदणी उगा
खिन्नावते....!

नाही भिजलया वातीला
साथ वेड्या ठिणगीची....
दिवाळसणाला ज्योत
खंतावते....!

किती रात ती चालावी
कुरतडलेली वाट....
सोनेरी स्वप्नात टाच
भेगाळते....!

नाही चांदणपहाट
त्या रातीच्या नशीबाला....
सांभाळ मुठीत व्रण
काजव्यांचे....!!!




-----चैताली.

31 July 2008

स्वप्नांची परीक्रमा.....

सांभाळते आता मीच माझं स्वप्नं....
देणार नाही तूला.....चुकूनही उसनं....
जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे.....
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे.....!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या....
मागीतली तरी तु ......देणार नाही तूला....

तशी आधीपसूनच जपते .....फूलपाखरं स्वनांची....
फूलपाखरंच ती रे......एकजात हळवी....!!!
पायवाट होती फूलांची......काळजात छळवी....
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या.....
दिली गर्भरेशमी नक्काशी....तूच ना रे पदराला....

बघून येते माझी मीच आधीसारखी...
नाहीतरी एकटीच होते....राहीन एकटी...
येवू नकोस... आता तिथेच तु थांब.....अस्साच रहा उभा....
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा.....
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला...??

कारण.....
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज...
केली म्हणे.....आत्महत्या...!!!



-----चैताली.

29 July 2008

आभाळ माझं परागंदा......!!!

माहित नाही.....
सगळ्यांच्या बाबतीत असं घडतं कि नाही...
कि माझ्यातच दडलीये अशी गर्द वनराई.....
सळसळ ,थरथर,घालमेल,तडफड.....
अन्‌ जीवाची न साहणारी परवड....
काधी-कधी तर ह्या ओढाळ मनाची दहशत...
स्वप्नांनाही बंदी घालते स्वप्नात येण्याची...
मग स्वत:वरच निलाजरी .....तोहमत...!!!

लक्ष द्यायचं नाही ठरवलं तरी कुचाळक्या करतंच मन...
ठोक्यावर ठोके... घणघण....
ना कोणाची साथ.....ना सावरणारा हात.....
फक्त मी अन्‌ माझ्या अस्वस्थ विचारांची वरात.....!!!
खुळावून जायला होतं पण रडायला होत नाही....
पसारा उधळलेल्या आभाळाचा......कासरा सापडत नाही....
माझ्या मनाचा वारू आटोक्यात येत नाही....

अस्वस्थता अशी उतू जात असता.....
मन होतं रानभरी.....जीवही घाबरा.....
वाट चुकतात चांदण्या माझ्या......
आभाळ माझं परागंदा......!!!



------चैताली.

27 July 2008

शब्द मौनानं पाळला.........

तुझ्या भेटीची खुमारी
अशी चढली चढली
जसा मोगरा फुलला
भर उन्हात दुपारी

अलगद वर आली
होती दडली दडली
मनी सागर मातला
फक्त मोतीच पदरी

आज परत बावळी
वाट पाहीली पाहीली
अशी घालतोस कसा
तु साद वेळी अवेळी

घडेल काहीच्या बाही
म्हणताना नाही नाही
शब्द मौनानं पाळला
बोलू नको कुठे काही

मिलनाने तुझ माझ्या
फुटे पालवी पालवी
रंग हिरवा आभाळा
कळी फुले सतरंगी

येशील का परतूनी
अशी झाले ओली ओली
कळा लागल्या जीवाला
रात सारी अंधारली


---- चैताली.

असा जीव पाखडावा....

असा जीव पाखडावा....लागावा विचार- खडा....
काचेच्या स्वप्नांना जावा बिलोरी तडा....
अंधाररानाला.....फितूर मशालवाटा....
नको ते झुरणे...नको ते उरणे....
नकोच ती झांज...नको पदन्यास....
नभांची कुशी...आभाळाशी नातं...
मोहाच्या घराला....भगवे दार.....
सळसळ पिंपळाला ....वंचनेचा पार....
दळणाऱ्या जात्याला....उगा भरडभास....
सैलावल्या वर्तुळाला...मुक्तीचा ध्यास....
अन्‌ अश्रांत पिंडाला नुसते... भासाचे काक.....!!
हवा गं कशाला उष्टावल्या रातीला.....पहाटेचा घास....!!
आहेच ना भुतकाळाच्या राशीला....सांप्रत ग्रह.....
दे जाणिवा.....संवेदना....
नको आत्मभान......
नको रे ते आत्मभान......!!!



----चैताली.

15 July 2008

जाऊ दे ना रे....!!

"थांब नं जराशी.....बोलशील माझ्याशी...!!!"

उशीर झालाय...चंद्र डोक्यावर आलाय....
चांदण्यांची लाडिक शपथ घालशील....
हे माहित आहे मला....
जाते रे......!!

जाउ नकोस गं अशी एकदम.....!!!
मग चांदण्यांचाही चटका लागतो मला....
तूझ्या नाजुक-साजुक पावलांबरोबर....ती शुक्राची चांदणी डोलतेय बघ...
तिच्यासाठी तर थांब.....!!

असं अडवू नकोस.....वाट अडखळते माझी...
जाऊ दे ना रे....!!

जातेस.....पण एक सांगू......
तु नसताना जगणं कुरबूर करतं उगाचंच....
त्रास देतात जीव काचले भास....
सहन होत नाही.....
चांदण्याचे हसे...नक्षत्रांचे ठसे...

अंगावर येतो बघ ना....
ऋतूंचं आडमुठेपणा....
फूलांचा प्रासंगिक करार.....
अन्‌ झाडांचा हिरवा बाणा......!!!

आता तर थांबशील......???

-----चैताली.

11 July 2008

घोर निळा तु......तुझ्यात रंगू दे...!!!!

कळतंय मला....
हे गुंतणं चांगलं नाही....
हे झुरणं जीव घेवून राहील....
तु एक सागर....... संन्यस्त....
मी एक भिज-बिंदू..... अव्यक्त....
ठरवलंच आहे आता वाहायचं.....निर्धास्त....
विरायचं तुझ्याच आभासात....
करू किती जपवणूक......अश्रूंची मिरवणूक....
तुच सारं समजून घे....
मजसि सामावून घे....
घोर निळा तु......तुझ्यात रंगू दे...!!!!

04 July 2008

आभाळभरून हळव्या सरी......

आभाळभरून हळव्या सरी...
कशी जाऊ सख्या सांग मी घरी..



वाटेतले पक्षी गजबज झाडा...
रंग हिरवा आला साजूक पंखाना...
रेंगाळू लागल्या तीन्ही सांजा..
रात साजे चांद डोक्यावरी...
आभाळभरून हळव्या सरी.....
कशी जाऊ सख्या सांग मी घरी..

रंग फुलपाखरी मनाला तुझ-माझ्या...
पावसाचं वेड.. अश्श्या हिरव्याकंच लाटा...
मोहोरून गेल्या राती साठवून थेंबा...
झाल्या वाटा आज रानभरी....
आभाळभरून हळव्या सरी...
कशी जाऊ सख्या सांग मी घरी..

मनातले मी सारे जाणते तुझ्या...
न्याहाळू नको असा भिजल्या अंगा...
रंगते मी अशी तुझ्या रंगा...
लाज वाटे साज तुझा ओठी ...
आभाळभरून हळव्या सरी.....
कशी जाऊ सख्या सांग मी घरी..

-----चैताली.

27 June 2008

जागे रान...जागे भान....!!!

जागे रान...जागे भान....
निजल्या पापण्यांत माझं भिजलं गान....
शोधती वाट दवबिंदू पावसात....
असल्या घायाळ रातीनं....
प्रीत जपावी किती बेभान...
जागे रान......जागे भान.....!

वाजे बासर.. असा जागर..
एकल्या पानावर हिरवी झापड....
हरवली तान खुशाल रानात....
असल्या घायाळ रातीनं....
सूर जपावे किती बेभान...
जागे रान......जागे भान.....!

नाचे मन ....मोहरे तन....
पावसाच्या रेघात स्वप्नांची पखाल..
चेतली ठिणगी पाण्याच्या वेडात...
असल्या घायाळ रातीनं....
वन्हि जपावा किती बेभान....
जागे रान.....जागे भान.....!


-----चैताली.

21 June 2008

तरी ओठ हलतातंच माझे.....

असंच होतंय बघ.... आजकाल सारखं.....
तुला साद घालायची नाही म्हटलं ना ....
तरी ओठ हलतातंच माझे.... निमिषार्ध....
ठाम उभी रहायचं ठरवलं आहे...
तरी थरथरते मी..... अंतर्बाह्य....
तुझ्या पायरवाने की....... न येण्याने?
येवू नकोस तु... पण निदान हाकेला 'ओ' तर दे...!
प्रतिसाद नाही तर..एखादी गझल गुणगूण....
तेवढीच..... माझ्या नि:शब्द रानात रुनझुण.....
निदान तु... येवुन गेल्याची एखादी खुण?
हो ना... ओला... कधीतरी मझ्यात झिरपून....
मग अलगद येईन ओठांवर तुझ्या..... तुझीच कविता बनून...!!
आणि मी.......
मी ही गाईन समरसून... राहीन भ्रमात गुंगून....
तु हाक मारलीस असं समजून......
नाही का????


----चैताली.

पाऊस माझा.....्पाऊस तुझा.....

पाऊस माझा.....्पाऊस तुझा.....
्भिजून ्गेला आपल्यात असा....
भिजताना तुझी हळवी चाहूल...
दाटलं मनी ओलेतं काहूर.....


पाऊस माझा.....्पाऊस तुझा.....
रुजून गेला आपल्यात असा....
रुजताना त्याचं हिरवं पाउल....
साठ्लं मनी बन ते ्नाचरं....


पाऊस माझा.....्पाऊस तुझा.....
भरून आला आप्ल्यात असा...
भरताना माझं अंग-अंग मोरपीस...
घुमलं मनी रूप ते हासरं....

्पाऊस माझा....्पाऊस तुझा.....
भिजून ्गेला आपल्यात असा....



-----चैताली.

बावरी पहाट माझी....अबोली सांज....!!!

का अशी मी...माझ्यात दंग...
बावरी पहाट माझी....अबोली सांज...
हासू कशी.....आसू किती....
नको साद घालू..... मी वाटेतली भूल.....


ढळत्या रातीत माझी...सोनभरली सकाळ...
शहारल्या पापणीत...मोहरली नव्हाळ...
वाहू किती.... साहू कशी... ......
नको साद घालू.... मी चांदण्यांची भूल...
का अशी मी....


मोहरल्या बनात माझी....पानहिरवी बहार...
उमलत्या कळीत...गंधाचा कहर...
सांगू कशी...लपवू किती....
नको साद घालू..... मी रानातली हूल....
का अशी मी...

का अशी मी....माझ्यात दंग....
बावरी पहाट माझी....अबोली सांज....



-----चैताली.

२१ जून ०८

16 June 2008

भिडवते नजर.....सुर्याशी थेट...!!!!

घेऊन चंद्र स्वत:चा इथे प्रत्येकजण उभा...
अहो...आवरतोय...सावरतोय .... स्वत:चीच आभा..
ठेवा तुम्हालाच ते सुर्य-बिर्य,सारे चंद्र...
मी नाही पाळत असले भिक्कार छंद !


ग्रह तुमचे.. तुमचा चंद्र...तुमचाच सुर्य...
पेरा तुमच्या शब्दांत...महान सारे गुरूवर्य...
राहूद्या तुम्हांलाच...ते आकाश निळं...
अरे..अरे..आधी सांभाळा तुमची भुयार-बिळं !


घेवून फिरा तो विंधणवारा..पाउसधारा..समूद्र सारा..
कोळून प्यायलेय मी त्याच्यासारखे....दहा-बारा..
झाडांनाही द्या हवे तर तुमचेच नाव...
माझ्या तर स्वप्नांतही नाही असल्या गोष्टींना भाव !


कोणी क्षितिज घ्या...घ्या कोणी अवकाश...
नको मला काही... आहे ना युगायुगांचा वनवास...
सांभाळा तुमची पृथ्वी... सजवा..नटवा..तिला...
ठेवला आहे मी माझ्यासठी ..बुरुजवेडा...ढासळकिल्ला !


हो! आहे मला गुर्मी.... मझ्या एकटेपणाची...
कोण तुम्ही? खड्ड्यात जाऊदे..साक्ष नात्या-गोत्यांची...
समेटून घेतलंय मी माझं "माझ्यात" बेट...
म्हणूनच तर भिडवते नजर.....सुर्याशी थेट...!!!!



----- चैताली.

जर तु तो कान्हा असशील तर ऐक....

जर तु तो कान्हा असशील तर ऐक.....
सतर्कतेच्या परिसीमा ओलांडून.... बघ जरा खोल आत...
रंगलाय तु कशात?
मी तर केव्हाचीच सावळ-सावळ...डोळ्यांतही तुझं काजळ..
मात्र थांब जरा.... मला गृहीत धरून चालू नकोस त्या मीरेसारखं...
मी मुक्त... स्वैर भक्ती.... शब्द्शक्ती...
फसला असेल तो कालिया... त्या गोपिका...
दिली असशील त्यांनातुझि बासर ... प्रेम -दया....पसाभर....
पण माझे आर्त सुर अजुनही रुंजी घालतात तुझ्यात त्यांचं काय?
राधांमधे...मीरांमधे गुंफणार म्हणतोस मला...
मग धागा पक्का घ्यावा लागेल तुला
कारण मी भारी ठरेन त्यांना...निश्चितच!!
वृंदावनात... द्वारकेत त्या रमल्या .... रमल्या त्या गोकुळी...
पण मझ्या भक्तीची जातकुळी... निराळी..
तरंगल्या त्या सगळ्याजणी सुरांवरच...
पण रणांगणावर कोण होते तुझ्या शब्दांमध्ये?....मीच ती गीता..
सुर्यात तर तुचआहेस रे! पण बघ ..असंख्य तेज-गोलकांमध्ये आहेच माझीच छबी ..तेजस्वी
आठव जरा.. यशोदेने बांधलेल्या दोरांमध्ये कोण होतं?
द्रौपदीच्या शब्द-आसूडांमध्ये कोण होतं??
दुष्टांचं निर्दालन.... तुझं सुदर्शन.... गतीतही मीच होते....
राधा...मीरा...गोपिका ....ह्या तर फक्त आराधना...
मी समर्पणाबरोबर येणारी ...साधना..
आणि संन्यासाचंच म्हणशील तर.....
ग्रुहस्थीचंच बोचकं बांधून टाकलंय...
तरंगत असेल बघ ते...तुझ्या बासरीबरोबर...
यमूनेमध्ये!!!!


------ चैताली.

(त्या सावळ्याची माफी मागून....!)

08 May 2008

माझ्या कवितेच्या पानावर

माझ्या कवितेच्या पानावर
चालणारी मुंगी काळी
घेवुन चालत होती
आठ्या चार कपाळी

शब्दा-शब्दात अडकली
अल्प विरामा थबकली
टोकदार शब्द येता
जरा जरा चमकली

खरेच का माझी
तिला कविता कळली
मागे पुढे होत
मान हलवित म्हणाली

पांढरयाच केलं काळं
आहेना सारं आलबेल
सांगते तुला काही
छान आपलं जमेल

नक्की शोधते माझ्यागत
तुही जिणं कण-कण
वेचतेस ना बाई
शुभ्र साखर क्षण

जाते बाई चल
लिही तुझं-तुझं
आहे मला न्यायाचं
मेल्या मुंगीचं ओझं

जाता जाता बघून
कसं-कसंच हासली
कवितेत माझ्या तिची
इवली पावलं उमटली




----- चैताली.

"सखा".....सर्वसमावेशक असा !!!

सगळ्यांना मित्रं-मैत्रिणी असतात .... मलाही आहेत...
पण तु माझा "सखा" आहेस....
त्या निळ्या,मिश्किल कृष्णासारखा..... अथांग.....
काहितरी शोधत होते.... युगोनयुगे....
ते तुझ्याकडे आहे... अगदी शुद्ध स्वरुपात.....
फुलांवरून हात फिरवत असताना... आई गं!
टचकन काटा रुतला मला... तलमळले....मनापासून कळवळले!
शोधला काटा... पण बहुतेक फुलंच टोचलं असेल मला.....
तु बघत होतास स्थित्यंतरं ...... स्थितप्रज्ञासारखा!
त्या बेसावध क्षणी.... मी भान विसरले,
तुही माझा हात धरलास.... किंबहुना मला तरी तसे वाटले....
आणि आपण निघालो त्या क्षितिजाकडे...
केव्हाच पोहोचलो असतो ..... अल्याड काय अन् पल्याड काय!
पण तू माझा हात सोडलास ......!!!!! म्हणालास.....
"चल जा! मार भरारी....मी आहे इथेच..."
मी चमकून बघीतले तुझ्याकडे आणि क्षणात मळभ दुर झाले.....
मी पिसाहून हलकी होउन उडाले...
कुठेही असेन मी आकाशात....
खात्री आहे मला.... माझ्याकडे त्याच अनिमिष नेत्रांनी बघत असशील तू ...... नितळतेने भरलेल्या.....
म्हणुनच तु माझा "सखा" आहेस..... सर्वसमावेशक असा!!!


------ चैताली.

मीलन साक्षीपाड....


ना गुंतता..... मी गुंतले...
जुळता जुळता खळ्ळ्‌कन फुटले...
अन्‌ वेचताना परत घरंगळले....
बरं झालं..... प्रेमाला सावली नसते...
नाहीतर सावलीच्या कडेकडेने ओघळले असते....
मग प्रश्न ....ओहोळ माझा ओला कसा??
ओलेच डोळे.... रुद्ध घसा..
रुद्धतेत मी बद्ध.....घट्ट....
जाणिवा-नेणिवा आकलनापार....
साक्षीला कोण?? मीलन साक्षीपाड....
मिलनात त्या काय वसे......
खुळे विचार.....वेडे ठसे
विचारांना पुरेना ....गाव-कुसे..
प्रेम माझे असे-कसे.....असे-कसे????



----- चैताली.

सपान निळे....

ओझरता स्पर्श
उमलती मनी
चांदणफुले....

हळवी पाखरं
नजरानजर
आकाशझुले....

मिटताना घट्ट
अलवार शब्द
आनंदमळे...

मनी छनछन
मलमली गान
घुंगरवाळे....

सोनेरी पहाट
हिरव्या रानात
सपान निळे....


----- चैताली.
जाळाचं जंजाळ
सावली शोधतं
पिकाला आमच्या
आक्शी जाळतं’...

माईच्या डोळ्याला
आसवाची धार
रडतो कोरडा
माहाच बाप...

काय्बी करावं
द्येवाला म्हणावं
आमच्या रानात
पानी वाहावं...

आताशा समदी
झाली गप्गार
उघडा संसार
कुठेशी जावं....

मोडकी झोपडी......


माह्याच बापाची
मोडकी झोपडी
पावसापाण्यात
वाहून ग्येली

फाटक्या संसारी
लावता ठिगळ
मायबी एकली
खंगून ग्येली

संसाराच्या पारी
फसली सावली
दाणं जोंधळ्याची
करपून ग्येली

उजाड शिवारी
आसवं रडली
सपान औंदाही
धसून ग्येली



---- चैताली.
....हे शब्द मैत्राला अर्पण....!!!


सखे......

तुझ्या माझ्यात गं दंग
असे उदासीचे रंग
कसे उठती सारखे
मनजळात तरंग


जितके जाईन खोल
माझी मलाच पोच
अशी आहेस नितळ
जणू माझेच प्रतिबिंब


लावताना आज दिप
उगा थरथरे ज्योत
सखे....दोघींच्या डोळ्यांत
दाटती मैतरथेंब


-----चैताली.

09 April 2008

तुझीच अभिमंत्रित अभिव्यक्ती.......!!!

वाहून नेत असते मी....
भ्रमाचे भोपळे....अन्कित्येक गहाळ शून्य...
सोडवत असते...निर्णयगुंते....अनिर्मित...
अधाशासारखे पानं उलटते...सारं आकाश पालथं घालते....
संदर्भ शोधते तुझे....अतार्किक...
सैरभैर होवून विचारडोंगर पोखरते...
माझं स्वत:चं (?) अस्तित्व पणाला लावून...
जगरहाटीसाठी गहाण पडलेल्या तुला....
फुटक्या-तुटक्या,विखुरलेल्या कणांमधून साद घालते..
अस्थीहिन सापळ्यांतून.. कातडी वाचेल का...अशा..
अमोघ...अगम्य शंका (कातडीऐवजी??)पांघरून फिरते ....
कधी क्षुब्ध...कधी लुब्ध होवून करते अंत्यहीन नर्तन....
तर कधी बिनवाद्याचे...बिनतालाचे....आश्रित संकिर्तन.....
मी तुला अशी सुर्यांत.....चंद्रात...धुंडाळत असताना...
असे बिनमरणाचे....सरण जगत असताना....
देत जा इशारा..तुझ्या विहित अस्तित्वाचा......हे कस्तुरगंधी .....
अन्अशीच झरत राहूदे...माझ्यातून....

तुझीच अभिमंत्रित अभिव्यक्ती.......!!!


-----चैताली.

10 March 2008

ये ना...
चाफ्याच्या झाडाखाली...
फुल सापडणार नाही...
सुगंध शोधणार असशील ...
तरच ये....!

ये ना...
घनतुटक्या आभाळाखाली...
चंद्र सापडणार नाही...
तिमिरांत शोधणार असशील...
तरच ये.....!

ये ना...
मुक्त झऱ्याखाली...
मोती सापडणार नाही...
प्रलयं शोधणार असशील...
तरच ये....!

ये ना...
मऊशार दुलईखाली...
उब सापडणार नाही...
विण शोधणार असशील...
तरच ये....!

यायचं तर ये...
जायचं तर जा...नाहीतरी...
मी सापडणार नाही...
तुला शोधणार असशील...
तरच ये...!!!


---- चैताली.

चेहेऱ्यांची वाडी....

खिडकीतून बघताना
अंगणातल्या झाडाने
डोळे उघडून बघितले
आणि हाती ठेवली
आभाळाची कवडी

कवडीतून उधळताना
तुझ्या हास्याने
सात जन्म घेतले
आणि सहस्त्र फाटकी
स्वप्नं गुरफटली

स्वप्नांतून उडताना
भटक्या पाकोळीने
अग्निपंख विझवले
आणि आणून दिली
चेहेऱ्यांची वाडी

चेहेऱ्यातून हरवताना
ओरबाडल्या कातडीने
नक्राश्रू ढाळले
आणि परत आणली
झाडाची खिडकी

किंवा खिडकीचे झाड....


---- चैताली.

01 March 2008

घिरट्याही वांझोट्या...बेनाम...!!!!

काही सुचतच नाहीये आज.....
शब्दांच्या पायरी-पायरीवरून निसटत आहेत भाव...
बंदच बरी...उघडली कोयरी..तर उगा सांडायचे कुंकू-बिंकू...
वाहिलेलेच बरे...फोडले नारळ ...तर उगा निघायचे खराब-बिराब...
इथे नैवेद्याच्या ताटालाच मुंग्या लागल्या असतील....
तर बाकीचं काय घेवून बसलात...??
फुलं-हार-तुरे...... पोथ्या-गाथा...
सगळंच वाहून-वाचून झालंय आता....
सम्पलाय सगळा साठा...... उतरतोय ताठा....

समजून-उमजून वाटच वाकडी झाली .....तर..
तर... पांथस्थानं काय करावं?
चालावं कडे-कडेने..... कि मागे सरावं....???
प्रश्न...प्रश्न.....प्रश्नांच्या मुंग्या...मुंग्यांसारखे प्रश्न....
कोण कुठला आगंतुक कृष्ण.....
बासरी वाजवून जातोय....आणि आपण धुंदावतोय...खुळावतोय...
बिकट वाट... सगळंच धुरकट..... आभाळाचीही फरफट....
एक तर गर्द घनराई......मन जणू एकटी-दुकटी बाई...
किती सावरावं....हरवावं.....परत सारवावं...??
घारीसारख्या घालाव्या घिरट्या.... भिर-भिर भिरक्या...
त्या पंखाना नाही गाव....ना ठाव.....
घिरट्याही वांझोट्या...बेनाम...!!!!




-----चैताली.

गच्चं भिजलं वेड...

येत असत घरा....उभा तो(पाऊस) वळचणीला.....
म्हणाला चल लावूया स्पर्धा.....
आज मि कोसळतो जास्त की तू ?

" चॅक " तोंडानेच काढला आवाज...
काहीच काम नाही का रे तुला?
सारखा माझा माग...
जा बरा गपगुमान....

त्याचं हे नेहंमीचंच आहे बहरल्यावर रुत....
मग माझ्यशिच लपाछपी...
मग माझ्यावरच शिरजोरी...
श्रावणात येतो नुसता उत.....

जा ना..जरा त्या पोरांशी खेळ...
माझीच का छेड?
नवरा रागवेल..लावशील मलाही...
तुझ्यासारखं..गच्चं भिजलं वेड...

घाबरलीस ना,आज जरा जास्तंच भरुन आलोय म्हणून...
सोडणार नाही,ओलं तुझं मन..करीन ओली तनू..
आलोय पुर्ण तयारीनिशी....

मग मीही खोचला पदर,
ओढ्ली त्याची चादर...
म्हटलं जीरवीन खाशी....
आणि लिहिली कविता लख्खं आरशी...मोरपिशी...

माझे शब्दं...त्याची टपटप...
बराच वेळ चालले तांडव....
सैरावैरा झाली रात्रं ..तीला सूचेना पहाट..

असं त्याचं माझं भांडण...
पण गट्टी काही सूटेना...तुटेना...
त्याची ओली चाहुल..मनात मावेना...मनात मावेना...

___चैताली.

अमावस्येच्या अंधाऱ्या रातीची घुसमट..

अमावस्येच्या अंधाऱ्या रातीची घुसमट..
काल ऐकली मी...
काय नव्हते त्यात...
सळसळ..थरथर..घालमेल..
तडफडीला,फडफडीला आवाज नव्हता त्या...
फक्त होती गहिरी खोली..... गुदमरून अंधारलेली...
मला माहित होतं....असंच असतं...
अशा रातीशी जास्त बोलणं रास्त नसतं...
पण तिलाही वाटत असेल ल्यावंसं..... चांदणं...
दुखत असेल असं..दर पंधरवड्याला...वांझोटं येणं....!!
उगाच फिरत बसते...मग ती अत्रुप्त आत्म्यांबरोबर...
स्मशानात बसून गप्पा मारते.... थडग्यांशी..
वेळ सरत नाही म्हणून...
खापरं गोळा करते फुटक्या मडक्यांची...
रस्ते सुद्धा साथ देत नाहीत तीला...
पडून असतात निपचित...तिमिरांध...!!
धावत सुटते मग ती अथपासून..इतिपर्यंत...
दिसतात मला तिचे अश्रू.... कट्टरकाळे अंधारथेंब...
बरं होईल..सापडली तीला जर एखादी...चंद्रशलाका..
साथीला राहील मग प्रकाश...चिरका...
बधिरलेला का होईना...!!!




---चैताली.

आणि गात राहिली.....माझ्या शब्दांविना....!!!!

MüÉsÉ qÉÉfÉÏ MüÌuÉiÉÉ WûUuÉsÉÏ...
ÌMÇüoÉWÒûlÉÉ qÉsÉÉ iÉUÏ AxÉå uÉÉOûsÉå...oÉåcÉælÉ fÉÉsÉå qÉÏ...
zÉÉåkÉiÉ xÉÑOûsÉå qÉaÉ WûÉiÉÉiÉ MüÉWûÏ cÉÉÇShrÉÉÇcÉÉ mÉëMüÉzÉ bÉåuÉÔlÉ...
oÉÍbÉiÉsÉÇ iÉU qÉÉfrÉÉcÉ AÉiÉ....ZÉÉåsÉ...
zÉoSÉÇcrÉÉ aÉÉåPûsÉåsrÉÉ iÉtrÉÉuÉU .....ÌaÉUYrÉÉ bÉåiÉ WûÉåiÉÏ iÉÏ...
LMüÉ WûÉiÉÉiÉ ÌuÉfÉsÉåsÉÉ xÉÑrÉï AÉÍhÉ SÒxÉîrÉÉiÉ ÌWûUqÉÑxÉsÉÉ cÉÇSì bÉåuÉÔlÉ.....!!!
"xÉZÉå ....MüÉ aÉÇ...??? ÂxÉsÉÏxÉ...!!!" qÉÏ qWûhÉÉsÉå....
irÉÉuÉU aÉÑRû MüOûÉ¤É OûÉMüiÉ qWûhÉÉsÉÏ...
"Nåû aÉÇ...!! MÇüOûÉVåûrÉ LuÉRÇûcÉ...
xÉÉUZÉÇ mÉÉlÉÉÇuÉU EiÉÃlÉ,pÉÉuÉÉÇiÉ xÉÉÇQÕûlÉ....
zÉoSÉÇiÉ AQûMÔülÉ.....pÉÉåuÉÇQûsrÉÉxÉÉUZÉÇ fÉÉsÉÇrÉ....
LMüOÇû UWûÉrÉcÉÇrÉ eÉUÉ...!" qWûhÉÔlÉ ÌTüxÉMüÉUsÉÏcÉ qÉÉfrÉÉuÉU...
qÉsÉÉ jÉÉåQÇû aÉsÉoÉsÉÔlÉ AÉsÉÇ..
QûÉåtrÉÉiÉsÉÇ mÉÉhÉÏ WûVÕûcÉ ÌOûmÉsÉÇ...
"qÉsÉÉ iÉUÏ MüÉåhÉ AÉWåû aÉÇ iÉÑfrÉÉÍzÉuÉÉrÉ.....??
rÉå lÉÉ.....AzÉÏ SÕU eÉÉF lÉMüÉåxÉ lÉÉ..."
iÉU iÉÏ Tü£ü WûxÉsÉÏ...qÉsÉÉ ÎfÉQûMüÉÃlÉ...
AÉÍhÉ aÉÉiÉ UÉÌWûsÉÏ.....
AÉkÉÏ xÉǧÉxiÉ.....lÉÇiÉU ÌuÉU£ü WûÉåuÉÔlÉ...MÑüPûsÉÉxÉÉ AÉiÉï UÉaÉ...
qÉÉfrÉÉ zÉoSÉÇÌuÉlÉÉ....!!!!


------ cÉæiÉÉsÉÏ.