Translate

17 September 2009

गोठणं..थंडाळणं.....!!!

पुन्हा गोठणं....
पुन्हा थंडाळणं....
अस्वस्थता अंगावर घेवून निपचित पडून रहाणं.....!!
जमल्यास धावत सुटणं....
विचारांचे पेटते पलिते घेवून....!!!
तरीही फारसं काही होत नाही...
आधीसारखं उधाणून येत नाही....
मग उबाऱ्याची आस असलेले श्वास...
विचारांप्रमाणेच अस्ताव्यस्त होतात...
अचानक....
इतकावेळ साथ देणाऱ्या...
विचारांच्या सावल्याही पसार होतात ........
डोळ्यातलया बाहूल्या धुसर होतात ...

मग ओठ बोलतात ...जुजबी ....
अन....
अश्रू मात्र रडतात.......
हुकूमी .....!!!----चैताली.

02 September 2009

कविता तान्ही सच्ची.....!!

पाहीले डोकावून मी
आत खूप दिवसांनी
दिसले चिमणहासू
आणिक कविता तान्ही.....

दाखवावे लागलेच
आमिष घुंगूरवाळे
तेव्हा कुठे उतरले
जून जळमट-जाळे....

असावीच ती बहूधा
कुठेतरी खोल आत
परी गेली दबून ती
खोट्या गजबजाटात....

सोपे नव्हतेच कधी
तीचे अलगद येणे
फेडावे लागले आधी
पाप-पूण्य,देणे-घेणे....

सांभाळीन म्हणते मी
जीवापाड अशी तीला
येईल पालवी नवी
वटलेल्या डहाळीला....

नाही गड्या कोणी पक्के
सारीच मडकी कच्ची
करावी परी जतन
कविता तान्ही सच्ची....

-----चैताली.