Translate

25 July 2011

एवढं कराल का....???


   सकाळी दहा-अकरा वाजता दाराची बेल वाजली.... "आता कोण..?" पोराला काखेत मारून दार उघडलं... बघते तर समोर दोन पोलिस,बहुरुपी आहेत हे तर मी लगेच ओळखलं... पण तो मात्र लगेच.."घाबरू नका ताई..!" गालातल्या गालात हासत मी त्याला पन्नास रुपये दिले...वहीत नाव लिहिलं...
       मान वर केली तर शेजारीण माझ्याकडे अतिप्रेमाने बघत होती..."इस प्यार से मेरी तरफ ना देखो....प्यार हो जायेगा.." मी लगेच गुणगूणले तर... अंगावरच काय ती यायची बाकी रहात म्हणाली.."क्यों दिया पैसा... तू देगी तो हमकोभी देना पडता है... ऐसे लोगोंको तूनेही सर पे चढाके रखा हैन...!" ई.ई..... आणि खाडकन दार बंद केलं माझ्या नाकावर..{चष्मा वाचला..!}
       नेहमीप्रमाणे तेव्हा काहीही न बोलता मी घरात आले.. ( मराठी माणूस आणि परप्रांतीय...! )  पोराला एक ’प्रेमळ’ फटका घालून "बोंबलू नकोस" म्हणाले.. पण डोक्यात विचार सुरूच होते... काय बिघडलं मी जर पैसे मागायला येणाऱ्या लोकांना कधी पैसे दिले तर... नेहमी देते असे नाही गरजू असेल तर देतेच.. मी देण्याचे काम केलंय.. तो खोटं बोलो अगर खरं..!
       तीच गोष्ट विक्रेत्यांची.. येतात विकायला काही-बाही.. मला त्यांच्या तोंडावर दार बंद करताच येत नाही... मी विकत तर काही घेणार नसतेच.. पण ते मी त्यांना त्यांचं ऐकून घेवून हसून सांगते.. तेही हसत "धन्यवाद ठिक आहे" म्हणून जातात...
       उगाच त्यांच्यावर ओरडून काय साध्य झालं असतं...?? माझाही मूड खराबच ना... त्यापेक्षा माणुसकी म्हणून हसावं.. वेळ नसेल तेव्हा फक्त तसं निदान नीट सांगावं...
       तेच आपल्याला फोन करून म्युचुअल फंड, पॉलिसी विकणाऱ्या मुला-मुलींना आपण नीट मला सध्या काहीही नकोय म्हणू शकतो ना... मान्य आहे ही लोकं फार त्रास देतात...पण आपण त्याजागी असतो तर.. एखादी गरीब पण चांगल्या घरातली मुलगी पोटापाण्यासाठी हे काम करत असेल आणि कदाचित दिवसातून सारख्या शिव्या ऐकून घरी जाऊन रडतही असेल पण तिच्याकडेही पर्याय नसेल ना...!
        बस्स... एवढंच समजून घ्या असं माझं म्हणणं आहे... सगळ्यांना माणूस म्हणून आदर द्या....! एवढं कराल का....???
                          

11 July 2011

पल्याड रहातो पाऊस...

ढगांच्या अल्याड..
माझं गाणं...
पल्याड रहातो पाऊस...

थेंबांच्या वाटेनं..
आल्हाद जाताना..
वळून नको पाहूस....

हळव्या पखांना...
पाणेरी किनखाप..
नाजुक-साजूक...!

रुजतो पाऊस...
डोळ्यांत माझ्या...
माझ्याशी हितगुज...!

थेंबांची नक्काशी...
बोलते माझ्याशी...
नको ओंजळीत घेऊस...!

ओली अधास...
वाहते मनात..
संपवी माझा पाऊस...
.
.
फक्त माझा पाऊस...!


          ---चैताली.

08 July 2011

एक गाणं...पाऊस.. आणि ती...!

एक गाणं...
पावसामध्ये
सूर हरवून भिजलं...
पावसाच्या रेघांमध्ये...
लय शोधू लागलं...!

एक पाऊस...
रस्त्यावरती...
थेंब हरवून बसला...
तिच्या केसांमध्ये....
मोती होऊन फसला....!

एक ती...
त्याच्यासोबत...
मनसोक्त हसली...
त्याच्याच कुशीमध्ये ...
मंद-धूंद लाजली...!


      ----चैताली.