Translate

22 March 2010

राहूदे तुझ्याकडे.....!

आहे तरी काय माझ्या कवितेत...
काही काटेरी धुमारे...
काही चटके... विझते निखारे...
राखभर विस्तव....
अन निखालस कटू वास्तव...

पसाभर चांदण्या....
हिरमुसला चंद्र....
एखाद्या ढगाची उसनी सावली..
जी उगाचच...
सैरभैर आभाळभर धावली....

तरीही काही कविता....
राहूदे तुझ्याकडे.....
काही मनाशी ठेव जपून...
अन काही अंगणात ठेव पुरून.....!

जास्त काही लागणारच नाही...
एखाद्यादिवशी मनात झुरशील...
असतील-नसतील तेवढे उमाळे लपवशील...
दिसलंच तर जप डोळाभर..
माझं ओलं मन...

पाकळीही उमलणार नाही...
वाढेल कदाचित तुझ्या अंगणात....
फक्त ..फक्त खुरटं तण.....!!
---चैताली.

02 March 2010

अंगभूत वळणं..!!

तुलाही मी तशीच हवीय ना...

तुझ्या साच्यात ढाळलेली...

पण मग माझा कोरीवपणा....??

नसा-नसात भिनलेला ठाशीवपणा...??

कशी विसरू...

माझ्यात भिनलेली भिन्नतेची लय...

माझं माझ्याचभोवती असलेलं बिलोरी वलय...

तुला आवडतं ना....

तुझ्या डोळ्यात माझं विरणं....

माझं तुझ्यातलं डोलणं..

पण मग कसं थांबवू...

विचारांच्या झोक्याची दोलनं..

अंगाखांद्यावर आत्ता-आत्तापर्यंत...

मिरवलेलं ’स्व’त्वाचं लेणं......

तशीही मी तुझीच आहे रे..

पण मग...

कुठे अडगळीत नेवून टाकू...??

साधी-सरळ असली तरीही..

माझी... 'माझी'...

अंगभूत वळणं..!!

                         ---चैताली.