Translate

26 December 2013

देखावे

अस्तित्वहीन पोकळ देखावे...
माणसंच्या माणसं ओढताहेत त्यांच्या मगरमिठीत..
सुटका करू पाहणारे अडकून पडलेत
त्या देखाव्यांच्या कडांमध्ये..
देहांचे घसघशीत घोस बनून...

काही भुलून मोहून
त्या देखाव्यांना सत्य समजू लागलेत...
अन थिजवू लागलेत रक्त..
ज्यासाठी त्यांना मेंदू भिजवावे लागतात...
यच्चयावत धर्मांच्या,जातींच्या,समूहांच्या पिंपात....

मग असे शेकडो,हजारो,लाखो मेंदू
झुलत राहतात,नाचत राहतात..
रक्ताऐवजी नशा वाहवत...शरीरात...

कातडी कापली तरी,रक्ताऐवजी
घोषणाच बाहेर पडतात मग...
अगदी ऊर्ध्व लागून....!!!

.....चैताली.

किती दिवस...

किती दिवस...
निरर्थक शब्दांची झूल चढवून...
आणावी मेंदूला झिंग...

किती दिवस उसनं जगण...
चेहऱ्यावर खेळवत..
कमावलेलं हसू...
फेकावं समोरच्यावर...

त्यापेक्षा...
अस्वस्थेतेचे इमले बांधून...
चढावं त्यावर...
so called अविचारी..
मशाली घेऊन...
पेटवून द्यावी सारी..
व्यावधानिक व्यवहार्यता...

अन मोकळं होत जावं...
ठिणगी –ठिणगीनं.... 


...चैताली.

12 December 2013

.अस्वप्न.



तुझं कधी माझ्या
स्वप्नातही न येणं....
विस्कटून जातात..
जाणिवांचे कित्येक प्रस्तर...

अशी अस्वप्न घेऊन येतात

निर्वंश झोपेच्या राती...
ज्या जागत बसतात...
नाकर्त्या शक्यतांच्या...
पिलावळी सांभाळत...!

......चैताली.