Translate

21 December 2009

ते बघ....!

च्यायला...!
आलीच पून्हा खुमखूमी....
हृदय उकरून काढायची...
नसा न नसा खरवडून...
वेदना-बिदना ओकायची...


स्स्स्स्स...!
पून्हा डहूळली...
सुकली जखम ठसठसली...
अणु-रेणूंनी फोडली...
अंधाधूंद किंकाळी...

ते बघ....!
पून्हा झालीच हजरजबाबी....
फूत्कारत पेशी न पेशी...
झूगारणया सारे सारे...
तटतटले मरण छातीशी...


च्च..च्च....!
पून्हा साकळल्या डोळ्यांनी....
बांधले संधान..अतृप्त वेदनेशी...
खरडली शिरगणती...
आत्म्यासह प्रेतांची........!!



---चैताली.

13 November 2009

आत्मविभोर....

उभी आहे कधीची....
हाती घेवून नक्षत्रांची राख...
मागतंय तेजपीसांची उड्डाणं..
माझ्या अखत्यारीतलं आकाश....

मागताहेत भररातीला अर्घ्य...
तेजोहीन...लोंबकाळणारे सूर्य...
घालत आहेत येरझारे गलीतगात्र चंद्र...
झीजलेल्या काही चांदण्या...
पाहतात वाट....उल्का बनण्याची...
अन लाटा शोधतात...कही विस्थापित समुद्र...
वसाहतींनी रंगलेले डोंगर...
फिरत आहेत रानोमाळ....
रणरणत्या वाळवंटाला....
साहवेना भरकटलं आभाळ...

काय करू ह्या साऱ्यांचं...
नाही सामावत माझ्यात आता....
सूर्याचं अखंड अग्निहोत्र......
नाही झिरपत चंद्राचं उच्चरवातलं..
चांदणस्तोत्र...

सारंच कसं बेअसर...
"मी"नाही आज माझ्याबरोबर.....
उभी निरीच्छ..अचल....अपलक .......

होऊनी आत्मविभोर....!!



----चैताली.

02 November 2009

हे ही नेहमीचंच ......

हे ही नेहमीचंच ......
"रागावलीस.....चिडलीस माझ्यावर...??"
तुझं विचारणं.....
"नाही रे....तुझ्यावर कशाला रागावेन..."
असं म्हणत माझं डोळ्यातलं पाणी टिपणं...
हळूच सोडलेला सुस्कारा नकळत मला कळतोच..
दुखावलेली असतानाही हासणं मला जमतंच...
तूझ्यावर रागावून कुठे जाणार...
प्रत्येक वळणावर तूच भेटणार..

पण अश्यावेळी...
तूझ्या प्रेमाच्या वर्षावात भीजताना....
आत कुठेतरी एक कोपरा कोरडाच रहातो...
नंतर माझ्याच अश्रूंनी भिजवण्यासाठी...

पण बघ....जप मला....
इतकाही पाहू नकोस अंत ....
मी होईपर्यंत....कोरडीठक्क...!!



-----चैताली.

07 October 2009

क्रमप्राप्त..........!!

क्रमप्राप्तच होतं सारं...
ठार मेलेले आश्वास....
आणि अर्धमेले श्वास..
वाहत होते स्वप्नांची कलेवरं.....
असह्य झालेली....
कानांचे पडदे फाडणारी शांतता...
त्याचवेळी अश्रूंनी घेतलेली संथा...
मनाच्या शैथिल्यावर मात करणारे...
उरलेल्या निर्माल्याचे शल्य..

उदासिन पायरव आणि नयन अनिमिष...
उद्धृत क्षण आणि अर्धवट अभिलेख...
आता साथ देणार ...अंतापर्यंत...!!
बोठट शस्त्रानेही भेदरलेली [भेदलेली??]कातडी....
अन पिळवटून तुटलेली आतडी....
संथ लाटांखाली...पुन्हा...[का?]
शिष्ठ,क्लिष्ट मंथन...
अंतहिन वागवावे लागणारे...
हलाहलाचे लांच्छन....
अन मर्त्यालाही...
जगण्याचे बंधन!!....


---चैताली.

17 September 2009

गोठणं..थंडाळणं.....!!!

पुन्हा गोठणं....
पुन्हा थंडाळणं....
अस्वस्थता अंगावर घेवून निपचित पडून रहाणं.....!!
जमल्यास धावत सुटणं....
विचारांचे पेटते पलिते घेवून....!!!
तरीही फारसं काही होत नाही...
आधीसारखं उधाणून येत नाही....
मग उबाऱ्याची आस असलेले श्वास...
विचारांप्रमाणेच अस्ताव्यस्त होतात...
अचानक....
इतकावेळ साथ देणाऱ्या...
विचारांच्या सावल्याही पसार होतात ........
डोळ्यातलया बाहूल्या धुसर होतात ...

मग ओठ बोलतात ...जुजबी ....
अन....
अश्रू मात्र रडतात.......
हुकूमी .....!!!



----चैताली.

02 September 2009

कविता तान्ही सच्ची.....!!

पाहीले डोकावून मी
आत खूप दिवसांनी
दिसले चिमणहासू
आणिक कविता तान्ही.....

दाखवावे लागलेच
आमिष घुंगूरवाळे
तेव्हा कुठे उतरले
जून जळमट-जाळे....

असावीच ती बहूधा
कुठेतरी खोल आत
परी गेली दबून ती
खोट्या गजबजाटात....

सोपे नव्हतेच कधी
तीचे अलगद येणे
फेडावे लागले आधी
पाप-पूण्य,देणे-घेणे....

सांभाळीन म्हणते मी
जीवापाड अशी तीला
येईल पालवी नवी
वटलेल्या डहाळीला....

नाही गड्या कोणी पक्के
सारीच मडकी कच्ची
करावी परी जतन
कविता तान्ही सच्ची....

-----चैताली.

20 August 2009

पुन्हा एकदा हटकले मी....
दाराशी ओठंगून उभ्या स्वप्नाला...
जायला सांगितले त्याला...चमकत्या चांदण्यांचे दाखले देत...
आधीच आभाळाशी असलेलं नातं...सांभाळणं जड जातंय...
त्यात स्वप्नांची भर...!!
क्षितिजापार उघडणारी खिडकी..हल्ली उघडत नाही मी फारशी...
हळूच स्वप्न उतरतात त्यातून... मोरपिशी...
आभाळाची निळाई मग झिरपत रहाते मग...ढगा-ढगांनी...!!
पण खरं तर....विसरणं शक्यच नाही होत...
बेधूंद धुक्यामागचं वास्तव...
लख्खआरशी.....!!!


----चैताली

31 May 2009

आकाशसांधणी...!!!

एकाही रातीची चौकट पूर्ण नाही....
त्यामुळे तीच्या साच्यात ओतलेली स्वप्नंही अपूर्णंच....
आधी ह्या स्वप्नांचे साचेच साजेसे करून घ्यायला हवेत...
पण मग एक-एक कोन सांधण्यासाठी....
लांबलचक श्वासांची दोलनं....
अन कैकदा त्या स्वप्नांशी असंबद्ध बोलणं...

आता पून्हा तेच करणं आलं....
स्वप्नांसाठी रातीची मनधरणी..
मूर्त स्वप्नांसाठी अमूर्त साच्यांची नव्याने बांधणी....
नव्या दिवसाची नव्या सूर्याशी....
आकाशसांधणी...!!!



----चैताली.

26 April 2009

तुमच्याकडे असलेलं आकाश......!!!

जास्त काही बोलत नाही...
आकाशाशी असलेलं नातं मी चांदण्यात मोजत नाही...
जरा बिचकतंच गोळा करते..... विचारांचे कवडसे..
अन प्रकाशून स्वत:ला लगेच विझवते....
आकाशाचं काही वाटत नाहीच मला....
पंखांखाली लपवून फिरते मी ते....

तुमच्याकडेही असतील काही आकाशाचे तुकडे....
बसा जोडत आणि सांधत....
एखादा नाही सापडला तर या मग मागायला उसना...
देता येणार नाही मला...
सात आसमानं मिळून माझा एक पंख बनलाय...

सांभाळा...
तुमच्याकडे असलेलं आकाशही.....
एखादं पीस असेल....
माझ्याच पंखातून....
निसटलेलं.....!!



----चैताली.

07 April 2009

विषवल्ली...!!

अंधारकडे तोडून.
मी प्रकाशाकडे धाव घेण्याचा प्रयत्न करते....
पण परत तिथेच उभी हे बघून...
मुळं सावरतानाच उन्मळून जाते....
स्वत:ला हाका घालताना...
ठार बहिरी होते...
अदृष्याचं कफन ओढून...
माझे मी पण[?] जाळते..
थंडगार मृत्तिकेतून...
अस्थीकण शोधते...
मृत्युपत्र लिहिताना पण का मी...
शेवटच्या पुर्णविरामात घुटमळते...

मोह न कसला म्हणताना..
मिरवते"मी" पणाची बिरुदावली...
अन मग अमृतवेल शोधताना मीच होते....

विषवल्ली...!!


-----चैताली.

05 April 2009

जीव जडल्या भेटींना....

जीव जडल्या भेटींना....
नयनांत साठवते...
हरवू नये म्हणून...
आसवांना थांबवते...

असा का जडतो जीव...
असाच का वेडावतो..
आठवांच्या सावल्यांना...
उराशी कवटाळतो...

जपते वेडयासारखी
सख्या कुजबुज मनी..
रुणझूण शब्द तुझे..
अन माझ्यातली गाणी...

हरवले गाणे जरी...
शब्द जपते तुझे मी..
मी आहे तिथेच उभी...
तु साद घाल कधीही...

परतून येताना तु...
हासणं माझं आठव..
वेड्या आसवांना माझ्या...
माझ्याकडेच पाठव...



----- चैताली.

30 March 2009

चित्रासारखं....!!!

रात्री पुन्हा मी टक्क जागीच....
स्वप्नपुर्तींचे विकल्प आणि...
उर्जितावस्थेतले संकल्प...
उशाशी घेवून...
पहाट होताच एक-एक स्वप्न..
मी जगण्याच्या चौकोनात टाकून बघितलं...
ठिक्करपाणी खेळताना टाकतो तसं...
मग स्वप्नं उलगडायला लागले...
आभास आणि सत्य ह्यांचा टकराव होवून...
टवके उडायला लागले...जगण्याचेच...
उन्हाच्या झळा आणि त्यांना अडवणारा पडदा...
ह्यांच्या खेळात सावलीच बिचारी होते तसंच काहीसं...

आता नकोसं वाटतं...
प्रत्येकवेळी..
अपेक्षांची जंत्री घेवून उभं रहायाला..
आंतर्मनावर बहि:स्थ वृत्तीने बहिष्कार घालेन म्हणतेय...
म्हणजे सारं जीवनच देखणं होईल...चित्रासारखं...
आणि मी ही जगेन चित्रासारखं....!!!



----चैताली.

26 March 2009

.....नको दुभागणं.....!!

मी बंद केलं स्वत:च...
स्वत:ला मांडणं....
सोपं नव्हतंच कधी..
मनाला फेडणं....


आतापर्यंत काहीच...
बोलले मी नाही....
जमलंही नाही मला...
मुक्याने मागणं...


निस्तरणे शक्य नाही...
हे शाप-उ:शाप...
का जीवन-दोरीवर...
उगाच दोलनं...


किरमीजी दु:ख माझं...
डॊळ्यात राहीलं.......
दिसेना तेजपिसांची...
ती स्वप्नंउड्डाणं....


विकल गात्रांनी किती...
दु:ख उजवणं...
फरफट नको आता...
नको दुभागणं...



.....नको दुभागणं.....!!



----चैताली.

17 March 2009

थोडं उरावं.....!!

स्वत:लाच असुया वाटावी इतकं काही .....
हाती असताना...
एक करायचं..सारं काही लखलख...
चमकत असताना...
खोल नि:श्वास सोडून पळभर उभं रहायचं...
चमचमणाऱ्या ताऱ्यांना हातांनी दूर सारायचं...

तेव्हा त्या झगमगाटापासून दूर दिसतात... काही चेहरे...
आपली वाट पाहणारे......
आपण पुढे जावं म्हणूनच.....
आपला हात सोडलेले...

त्यांच्या डोळ्यातली चमक.....
हेच तर आपलं यश असावं...
पण ती चमक विझून जायच्या आत...
आपण दोन पावलं मागे फिरावं...
आकाश तर आहेच आपलं...
पण त्या आपल्यांसाठी....
कधी-कधी....
परत फिरावं...

थोडं उरावं.....!!



----चैताली.

09 March 2009

मन झिम्माड झिमाड.....

मन झिम्माड झिमाड..
असं अल्याड-पल्याड..
रंगवतं दाही दिशा.
असं झालंया उनाड...

मन भिल्लाचं पोर..
लावी जीवाला गं घोर...
धुंडाळतं दाही-दिशा...
अश्या खोड्या शिरजोर....

मन वेल नाजूकशी..
सुखी पानांची नक्काशी...
दुखावतं फूलांमध्ये..
होता पानगळ अशी...

मन बिल्लोरी आईना...
त्यात जगणं माईना...
पालवते साऱ्या आशा......
नवं स्वप्न चेहेऱ्यांना..

मन निघता प्रवासा...
जणू चोर-कवडसा...
प्रकाशून दाही दिशा...
होत जाई पुसटसा...

मन किनखापी रात...
चांदण्यांची गलबतं....
चमचम त्यांची भाषा...
वाऱ्यावर खलबतं...

मन रांगडा साजण....
असं प्रेमाला उधाण...
सुखावतो अंगोपांगी...
माझं खोटंच गाऱ्हाणं...



---चैताली .

02 March 2009

नसताना तु इथे भास रे अधे-मधे....
जीवनगाण्यातूनी नादणे कधी कधी....

गुंगल्या नयनात स्वप्न होऊन वसे..
तूझ्या नजरेत हासू वेचणे कधी कधी...

जाणीले कधीचेच,पण दाविले नाही..
नकोच स्वप्नं-घुंगरू,वाजणे कधी कधी

संवाद हा चालतो,पापण्यांचा गालाशी....
भासांत स्पर्शताना,नाहणे कधी कधी...

मग फूलांना येतो,गंध साजणा तूझा...
जरी पाकळ्यांचे त्या,भाळणे कधी कधी...

नजर नजरेत मिसळता,वेडीपिशी जाहले..
गुलाबी वेडात त्या ,रमणे कधी कधी....



----चैताली.

22 February 2009

'शब्दांच्या' कविता.....

मी माझं गाणं ऐकवलं तूला...
तेव्हा तु म्हणालास...."शब्द कुठेत..???"
.."तेव्हाच हरवले...
जेव्हा मी कविता वाऱ्यावर उधळल्या...!!"

तर तु स्वप्नाळलेल्या नजरेनं म्हणालास...
"चांदण्या बोजड झाल्या म्हणून...
कोणी आभाळ विकत नाही...
फूल सुकले म्हणून..
कोणी फांदी रुसत नाही..."

मी सुस्कारले..म्हणाले..
"बरंय..निदान तूझ्याकडे 'शब्दांच्या' कविता शिल्लक आहेत...
जप त्यांना....
माझ्या केव्हाच पांगूळल्यात...
रेंगाळून ....विखूरल्यात...
मलाच शोधताना......!!"



------चैताली.

21 February 2009

उपरती...!!

कायसं झालं काही आकळेना..
कणभरही उमजेना..
मनाध्याना..!!


अंधारामाजी..चालले अंधारा..
जीवन वाहिले मी तूझ्या...
नमनाला..!!


तुजविण रे वाट दावी कोण..
थरारले...झाले उन्मन..
कायामन..!!


वलांडूनी जनमानस-रिती..
नाही देहकुडीची क्षिती...
ने मजसी..!!


लोटता प्रवाही सुचेना काही..
निवावा आता जीव...व्हावी..
उपरती...!!



-----चैताली.

13 February 2009

उत्क्रांती........!!!

आजच नेमकी मी कशी विसरले...दिवा लावायला.......
आणि तीच वेळ अंधाराचे फावायला....
भिती वाटतच नाही आता अंधाराची...
केव्हाच माफ़ केल मी त्याला....
रडतोय आजकाल स्साला.....!!
उत्क्रांती झालीय माझी........
अश्रूंनाही भटकू देत नाही.... आसपास....
निचरतेय एक-एक रात..... सावकाश....
अश्रूंचीही आजकाल "आय-माय" काढते...
दु:खाला solid शिव्या घालते....
आता जास्त काही करत नाही....
..... मात्र एक करते...रोज एक..
कविता पाळते........!!!


------ चैताली.

08 February 2009

My wounded fins........

I just heard your song....
and you know what....
it's just like my song....
and the same circle I have around me....

Like a mermaid... I am...
In pursuit of crystal-clear waters...
you have your wings to fly through your skies....!!
Your own skies....
And I have boundless oceans....
Where I cant plunge in....!!

In fact...that circle....
I would like to feel it with my song...
which I never sing....
now it has started sinking....
I am not going to stop it.....
let it come to me....
let it swallow me....
May then I can sing my sonnet...
My wounded fins can get sea then ......

Mournfully....!!!!


----chaitali.

03 February 2009

माझ्या बाहूलीचे......

माझ्या बाहूलीचे......
सोन सानूलीचे.....
स्वप्न अलवार....
पापणीत....

चंद्र त्या चांदण्या....
मागशी गोंदण्या....
सांभाळ हातात....
हलकेच....

इकडून येते....
अशी मुरकते...
नाचते डौलात...
आंगणात......

तूझ्या फिरकीने...
गोल गिरकीने....
हासू कौतुकाचे...
विसावते...

बोलणे तोऱ्याचे...
हात नाचवते....
डोळ्यात विभ्रम...
जादूचेच....


जाशील उडून....
पंख पसरून....
अनादि आकाश....
तूझ्यासाठी.....


दिसता उदास...
माझ्यात हासते....
मलाच तु अशी...
सांभाळते....

मलाच तु अशी....
सांभाळते....!!!



-----चैताली.

27 January 2009

कफल्लक......!!!

काय झालंय कळत नाही.....
मी कोणाशीच आजकाल बोलत नाही.....
कितीही हाका दिल्या तरी.....
मी आत कोणाला शिरू देत नाही....
पोकळ शब्दांचे जत्थे घेवून निघते बर्‍याचदा........
सार्‍यांना वाटतं बोलली... हासली.....
अन् मी मात्र आतून तेवढीच अबोल.....
काय झालंय .....
खरंच कळत नाही......
कवितेचीही धुंदी चढत नाही.....
शब्द मात्र केव्हाच उतरंडीला लागलेत.....बेमतलब....
अन् मी त्यांच्यामागे.....
दिवसेंदिवस कफल्लक......!!!


----चैताली.

23 January 2009

आसूंच्या पल्याड.... देखणं हासणं...

आखल्या रेषेत...... रेखलं चालणं....
आसूंच्या पल्याड.... देखणं हासणं...

इवलं आभाळ.... आढ्याला टांगणं....
कधीचं जगते.... चौकटी जगणं...
घेताना भरारी.... काचली काकणं....
आसूंच्या पल्याड.... देखणं हासणं..... ||१||


पिंपळ पानाचं..... जाळीला जपणं....
आयुष्य रेषांच्या.... जाळ्यात सुकणं.....
सांभाळ साजणे..... रान हे उसनं.....
आसूंच्या पल्याड.... देखणं हासणं......||२||


चांदणं विरता..... उन्हाचं गोंदणं.....
जून्याच आभाळी.... चंद्राचं झुरणं....
सांभाळ साजणे.... पंखांचं रुसणं.....
आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....||३||


-------- चैताली.

22 January 2009

TELL ME.........!!!

can you see .......
my entangled dreams...
breezing through the branches of words.....
many a times....
i tried to slip my fingers through them.....
n I found.....
my enlightened soul.....

can you see.....
my vanishing wings....
flying through the pieces of sky.....
sometimes....
i tried to touch stars.....
n I found....
my fuming feathers.....

tell me....
whats true????
my enlightened soul......or......
my fuming feathers......



or never ending skies.......????



----- chaitali.

15 January 2009

राती लपविल्या मी............

नशिल्या नजरेने, खळ्यात हसतांना
बोलले मौनातुन, डोळ्यात असतांना

मिलनाच्या रातीत, दिठीत झुलतांना
शब्द मंतरलेले, बोलत असतांना

लख्ख चांदण्यांतुन, प्रकाश वेचतांना
चंद्र विझवले मी, नशेत असतांना

गंधीत झाले श्वास, मोगरा फुलतांना
झाली पहाट ऐसी, धुंदीत असतांना

ओठांच्या मिठीतुन, आल्हाद सुटतांना
राती लपविल्या मी, दोघे बहकतांना


---चैताली.

07 January 2009

तरीही....

पून्हा तेच.....विरक्तीचं सुक्त गात.....
माझ्यातली मी मिटून जाते...
आणि माझ्या डोळ्यांतलं रितेपण..
अनोळखी माणसानं पण जाणावं...
इतपत भरून येतं.....

मग परत एकदा मी तूला साद घालते...
तूझ्या कूशीची आस धरते...
ही दोघांमधली अभेद्य तटबंदी ओलांडणं सोपं नाही....
बरं आहे ना....
काही झरोके आहेत....कवितांचे...शब्दांचे....
ज्यातनं एकमेकांना डोकावून बघू शकतो आपण.....
सतर्कतेच्या परिसीमा जीथे संपतात....
तिथेच तर आपलं नातं सुरू होतं..

फक्त एक लक्षात ठेव.....
सादेला प्रत्यूत्तर दिलं नाहीस तर.....
कदाचित मी मिटून जाईन....
पुन्हा कधीही उभी राहू शकणार नाही...
इतकी कोलमडून जाईन....

तरीही....
तरीही खोल आत माझ्यात तूला धुगधूगी जाणवेल....
ती सवय मोडणारंच नाही अशी.....
माणसांवर विश्वास टाकण्याची....!!




-----चैताली.

05 January 2009

अव्यक्ता......मी अभिसारिका....

अव्यक्ता......मी अभिसारिका....
अवगुंठित........ शर्मिषठा......
निरंतन......चिरंतन......
बरसणारच तूझ्यावर...... नि:संशय.......
येईन नि:संकेत.....
कळणारच नाही तूला........
कसा वाहून गेलास ते......माझ्या झंझावातात....
बघ......मी एक वन्हि...एक वणवा.....
जो तूच गुणगूणावा....!!
शिल्लक माझ्यातली तु जमा करावी......
इतकी आर्त मग मी.... समा बांधावी.....
माझ्यातली "मी" तु सामावून घ्यावी......
बस्स....सामावून घ्यावी........!!!


------चैताली.