Translate

08 May 2008

माझ्या कवितेच्या पानावर

माझ्या कवितेच्या पानावर
चालणारी मुंगी काळी
घेवुन चालत होती
आठ्या चार कपाळी

शब्दा-शब्दात अडकली
अल्प विरामा थबकली
टोकदार शब्द येता
जरा जरा चमकली

खरेच का माझी
तिला कविता कळली
मागे पुढे होत
मान हलवित म्हणाली

पांढरयाच केलं काळं
आहेना सारं आलबेल
सांगते तुला काही
छान आपलं जमेल

नक्की शोधते माझ्यागत
तुही जिणं कण-कण
वेचतेस ना बाई
शुभ्र साखर क्षण

जाते बाई चल
लिही तुझं-तुझं
आहे मला न्यायाचं
मेल्या मुंगीचं ओझं

जाता जाता बघून
कसं-कसंच हासली
कवितेत माझ्या तिची
इवली पावलं उमटली
----- चैताली.

"सखा".....सर्वसमावेशक असा !!!

सगळ्यांना मित्रं-मैत्रिणी असतात .... मलाही आहेत...
पण तु माझा "सखा" आहेस....
त्या निळ्या,मिश्किल कृष्णासारखा..... अथांग.....
काहितरी शोधत होते.... युगोनयुगे....
ते तुझ्याकडे आहे... अगदी शुद्ध स्वरुपात.....
फुलांवरून हात फिरवत असताना... आई गं!
टचकन काटा रुतला मला... तलमळले....मनापासून कळवळले!
शोधला काटा... पण बहुतेक फुलंच टोचलं असेल मला.....
तु बघत होतास स्थित्यंतरं ...... स्थितप्रज्ञासारखा!
त्या बेसावध क्षणी.... मी भान विसरले,
तुही माझा हात धरलास.... किंबहुना मला तरी तसे वाटले....
आणि आपण निघालो त्या क्षितिजाकडे...
केव्हाच पोहोचलो असतो ..... अल्याड काय अन् पल्याड काय!
पण तू माझा हात सोडलास ......!!!!! म्हणालास.....
"चल जा! मार भरारी....मी आहे इथेच..."
मी चमकून बघीतले तुझ्याकडे आणि क्षणात मळभ दुर झाले.....
मी पिसाहून हलकी होउन उडाले...
कुठेही असेन मी आकाशात....
खात्री आहे मला.... माझ्याकडे त्याच अनिमिष नेत्रांनी बघत असशील तू ...... नितळतेने भरलेल्या.....
म्हणुनच तु माझा "सखा" आहेस..... सर्वसमावेशक असा!!!


------ चैताली.

मीलन साक्षीपाड....


ना गुंतता..... मी गुंतले...
जुळता जुळता खळ्ळ्‌कन फुटले...
अन्‌ वेचताना परत घरंगळले....
बरं झालं..... प्रेमाला सावली नसते...
नाहीतर सावलीच्या कडेकडेने ओघळले असते....
मग प्रश्न ....ओहोळ माझा ओला कसा??
ओलेच डोळे.... रुद्ध घसा..
रुद्धतेत मी बद्ध.....घट्ट....
जाणिवा-नेणिवा आकलनापार....
साक्षीला कोण?? मीलन साक्षीपाड....
मिलनात त्या काय वसे......
खुळे विचार.....वेडे ठसे
विचारांना पुरेना ....गाव-कुसे..
प्रेम माझे असे-कसे.....असे-कसे????----- चैताली.

सपान निळे....

ओझरता स्पर्श
उमलती मनी
चांदणफुले....

हळवी पाखरं
नजरानजर
आकाशझुले....

मिटताना घट्ट
अलवार शब्द
आनंदमळे...

मनी छनछन
मलमली गान
घुंगरवाळे....

सोनेरी पहाट
हिरव्या रानात
सपान निळे....


----- चैताली.
जाळाचं जंजाळ
सावली शोधतं
पिकाला आमच्या
आक्शी जाळतं’...

माईच्या डोळ्याला
आसवाची धार
रडतो कोरडा
माहाच बाप...

काय्बी करावं
द्येवाला म्हणावं
आमच्या रानात
पानी वाहावं...

आताशा समदी
झाली गप्गार
उघडा संसार
कुठेशी जावं....

मोडकी झोपडी......


माह्याच बापाची
मोडकी झोपडी
पावसापाण्यात
वाहून ग्येली

फाटक्या संसारी
लावता ठिगळ
मायबी एकली
खंगून ग्येली

संसाराच्या पारी
फसली सावली
दाणं जोंधळ्याची
करपून ग्येली

उजाड शिवारी
आसवं रडली
सपान औंदाही
धसून ग्येली---- चैताली.
....हे शब्द मैत्राला अर्पण....!!!


सखे......

तुझ्या माझ्यात गं दंग
असे उदासीचे रंग
कसे उठती सारखे
मनजळात तरंग


जितके जाईन खोल
माझी मलाच पोच
अशी आहेस नितळ
जणू माझेच प्रतिबिंब


लावताना आज दिप
उगा थरथरे ज्योत
सखे....दोघींच्या डोळ्यांत
दाटती मैतरथेंब


-----चैताली.