पाकळ्यात अंधाराच्या
रात उमलत जाते....
डोळा अंधार झालर
काहूरते....!
उगा आणतो वारा
गीत दवाळ क्षणांचे....
अंधारगच्च जमीन
स्वप्नाळते....!
पहाटेच्या त्या वाऱ्याला
सांजचाहूल लागते....
शुक्राची चांदणी उगा
खिन्नावते....!
नाही भिजलया वातीला
साथ वेड्या ठिणगीची....
दिवाळसणाला ज्योत
खंतावते....!
किती रात ती चालावी
कुरतडलेली वाट....
सोनेरी स्वप्नात टाच
भेगाळते....!
नाही चांदणपहाट
त्या रातीच्या नशीबाला....
सांभाळ मुठीत व्रण
काजव्यांचे....!!!
-----चैताली.
No comments:
Post a Comment