Translate

08 May 2008

माझ्या कवितेच्या पानावर

माझ्या कवितेच्या पानावर
चालणारी मुंगी काळी
घेवुन चालत होती
आठ्या चार कपाळी

शब्दा-शब्दात अडकली
अल्प विरामा थबकली
टोकदार शब्द येता
जरा जरा चमकली

खरेच का माझी
तिला कविता कळली
मागे पुढे होत
मान हलवित म्हणाली

पांढरयाच केलं काळं
आहेना सारं आलबेल
सांगते तुला काही
छान आपलं जमेल

नक्की शोधते माझ्यागत
तुही जिणं कण-कण
वेचतेस ना बाई
शुभ्र साखर क्षण

जाते बाई चल
लिही तुझं-तुझं
आहे मला न्यायाचं
मेल्या मुंगीचं ओझं

जाता जाता बघून
कसं-कसंच हासली
कवितेत माझ्या तिची
इवली पावलं उमटली




----- चैताली.

3 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख

स्नेहा---स्नेहासक्त said...

hi chaitali...
tujhi hi kavita mala far awadate..

PIN@LL said...

खूप आवडली....
छोट्या रुपात काही तरी मोठ्ठ....