Translate

24 April 2014

.चिमण्या.



त्याने
चित्रात काढलेल्या
चिमण्यांच्या सावल्या...
आज चिवचिव घेऊन
आल्या तिच्याकडे...

आणि नाचत म्हणाल्या..
त्याला
तुझी 
आठवण येतेय...

तिने
निरोप दिलाय
त्यांच्या इवल्या पंखांवर

ती चित्र बनून
उंबऱ्याशी उभी आहे
ओठंगून

येशील..?

   ...चैताली.

.मनस्व.



बाहेर पडू पाहणारं काही..

आतंच राहतं...

फुलत राहतं आतल्या आत...

भिनत जातं खोल खोल..

सुगंध बनून नशा देत राहतं...



मग ती नशा...

गच्च चाफा बनते.....



तो जर्द चाफा..

गर्द फुलांनी

काही बोलेलसं

असं वाटत राहतं नुसतं...



हे काहीसं

तुझ्यासारखं होतंय का...



काही न बोलता

मनस्व असणाऱ्या

तुझ्यासारखं....!!



    ....चैताली.




.मागू नकोस.



मागू नकोस...
आताच माझ्या कविता....
अजून भिनलेल्या आहेत
त्या माझ्यात खोल..

पेशे-पेशीला लगडलेल्या आहेत...
तोडू म्हणता...
तुटणार नाहीत त्या आताच...

देईनच तुला...
जेव्हा अलगद सुटून येतील
ओच्यात माझ्या...

पापण्यांवर तरारतील मग...
तेव्हाच अलगद टिपून घे
.
ओठांनी तुझ्या...

...चैताली.

. पापण्यांवर .



पापण्यांवर

फुलपाखरांसारखी

विसावलेली स्वप्नं...

अलगद चिमटीत धरून...

फुंकरते आकाशात...



सांगते त्यांना

उधळा रंग...

या जगद्व्याळावर



होऊदे चूर..

प्रत्येकाला एक-एका स्वप्नात...

रुजतील ती स्वप्नं

प्रत्येक तळव्यावर...



प्रत्येकजण फुंकरतील

अशी लाखो स्वप्नं

आभाळभर

मग

प्रत्येक पापणी बनून जाईल...

एक-एक आभाळ...

इंद्रधनुष्याला टेकलेलं.....



   ...चैताली.

.भोई.




आपल्याला वाटतं...
निबर झालोत आपण...
काळाच्या पायऱ्या चढताना...
बरंही वाटत असतं
आतून कुठेतरी...

सुस्कारा सोडतो
आता जरा निगुतीनं
जगता येईल म्हणून...
ओठांच्या कोपऱ्यातून
हसून घेतो आपण..
समजूतदार... मच्युअर्ड हसू...

कुठे माहित असतं तेव्हा...
पुढच्या वळणदार पायरीवर...
वात पाहत असतो....हळवेपणा...
डोळ्यांत सारं जगणं भरून...

ढकलून देतं ते आपल्याला
मग
आपण पुन्हा पहिल्या पायरीवर...
भोई बनून...
स्वत:च स्वत:चे .....
    ....चैताली.