Translate

21 November 2010

.. आभाळ विसरले नाहीच मी.... !

.... आभाळ विसरले नाहीच मी....
नभ जरा पांगले एवढंच.....
क्षितिजावरच पंख पसरले .....
त्या निळाईने नादावले एवढंच....
आता सडा -रांगोळी घालताना....
नक्षत्र चितारीत नाही मी...
धरतीशीच कुजबुजते एवढंच....
बाहेर तर केव्हाच पडलेय मी...
खोल..आत रुजते एवढंच.....

बरसणं....नभ होवून झुरणं....
सारं सारं आहे लक्षात....
आता शब्द विरलेत एवढंच....

अश्याने मी तरी कोसळेन किंवा कविता तरी.... ...
 अखेर दोन्ही प्रकार एकच... !!!

                  ----चैताली.

11 October 2010

स्वप्नं......

तु म्हणालास थांब.....
थांबले मी क्षणभर....पाय ठरत नव्हते तरी....
दिर्घ श्वास घेवुन... आरश्यात बघीतलं...
तर तिथेही...स्वप्नंच दिसली उरावर नाचणारी...
आणि श्वासालाही दरवळ स्वप्नांचा... तुझ्या नी माझ्या...!

परत म्हणशील सांगितलं नाहीस...
माझ्या स्वप्नांत अडकू नकोस रे.... फडफडशील...
माझ्या स्वप्नांसाठी झुरु नकोस...
माझी स्वप्नं म्हणजे निव्वळ फसवणुक...
फक्त लटकत्या भावनांची तटवणुक...

आकाशही हातात आलं रे!
पण त्यालाही एकच रंग करडा...
मनात होतं रंगीत कारंजं... फुलपाखरी..
च्चं! माझी स्वप्नंच रे काहीच्या- बाही...
पण सुन्नाट घोरण्यापेक्षा ती बरी....!

तरीही ती राज्यं मला खुणावतात...
येवून अंगोपांगी भिनतात...
विषवल्लीच ती..... अन् मी शापित राजकुमारी...
अभिशाप अहे मला स्वप्नांचा....
ह्या स्वप्नातून त्या स्वप्नात... फिरण्याचा...!!!

----- चैताली.

28 September 2010

......वाटतं....!!

वाटतं...
चालत जावं....
आकाशाच्या भिंती ओलांडून....
नसलेलं असलेपण पाठंगूळी मारून....

वाटतं....
विखरून जावं....
भोवतालचं भवंडलेपण...
उद्धृत वाटांच्या माथी मारून...

वाटतं...
कधी न कळावं....
नगण्य व्यवहारीपणाच्या...
शून्याचे घरंगळलेपण....

वाटतं....
कधी न कळावी...
वर्दळीची भाषा....
अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!


          ----चैताली.

20 September 2010

........सवाल तत्त्वांचा!!!


खरं कोणाला पटत नाही....
आणि खोटं मी बोलत नाही...
तत्त्वातंच बसत नाही ते माझ्या...
तत्त्वं-बित्त्वं फार मानते मी,
मात्र कुबड्या नाहियेत त्या माझ्या,
म्हणुनच अजुनही दमदारपणे पाउल टाकतेय.....
उगाळते त्यांना अधुन-मधुन आणि फासते जगण्याला...
तत्त्वांच्या पॅरामीटरखाली मोजते लोकांना!

पण कधी-कधी वाटतं....प्रातिनिधिक शब्दांचे ...
बुडबुडे तर नाहीत ना..... माझी तत्त्वं?
दयावं का त्यांना एवढं महत्त्वं ...
स्वत:च लादलेलं असामान्यत्व??
जाउन बसतात मुळांशी आपल्या भेगांमधील मातीसारखी....
लिंपा नाहीतर खरवडून काढा !!
तत्त्वं असावीत पारदर्शक.. डोळ्यांतल्या लेन्ससारखी...
दिसुनही येत नाही घातलीये म्हणून.. आणि स्पष्टही दिसतं...
धुळीपासुन जपावं लागतं मात्रं..... अहंकाराच्या!
हं! आणि घालून "झोपताही येत नाही"......

तत्त्वं पाळणारंच मी...
पण दावणीला नाही बांधणार...
गुलामही नाही बनणार त्यांची....
राज्यंच करायला लागली माझ्यावर ती तर......

बासनात गुंडाळून ठेवीन........ नि:संशय!!!!!!!


------- चैताली.

17 September 2010

सांग न सखया..

रडले परि...
भिजले न थेंबभर...
....
बोलले परि...
उमटले न कणभर...
....
सांग न सखया...
कुठेशी घेऊन जाऊ...
शब्दांचे अवडंबर....!


उमलले परि...
गंधाळले न पाकळीभर....
....
स्वप्नाळले परि...
निजले न पापणीभर...
.....
सांग ना सखया...
कुठेशी घेऊन जाऊ...
चांदणं आभाळभर...!


तेवले परि...
उजळले न ज्योतभर..
....
चालले परि...
पोहोचले न पाऊलभर...!
....
सांग न सखया..
कुठेशी निघून जाऊ...
वाटाच आंगणभर...!

            -------- चैताली.

27 July 2010

माझ्याकडेही एक पाऊस आहे...

माझ्याकडेही एक पाऊस आहे...
आसावलेला....उसासलेला....
पापण्यांआड दडून...
डोळ्यातच भिजलेला...

माझ्याकडेही एक पाउस आहे...
उधाणलेला...उफाणलेला...
तिरक्या रेघांमध्ये गुंतून.....
वेडावाकडा भरकटलेला....

माझ्याकडेही एक पाऊस आहे...
ढगाळलेला....तहानलेला....
अगदी भरून येवून...
बरसूनही तहानलेला....


माझ्याकडेही एक पाऊस होता..
रिमझिमता...रुणझूणता....
हळूच डोळे मिचकावून...
"येऊ..?"विचारणारा....



बघ जरा...
अजूनही असेल तो..वेडा..
गच्च भिजून...
तुझ्या अंगणात लपलेला...!

               ----चैताली.

21 June 2010

खरं तर मीही....

खरं तर मीही....
कविता लिहायला हव्यात...
ह्या वेड्या पावसावर......


झिपऱ्या केसांना सावरत...
नाचऱ्या थेंबांवर खूष होऊन....
भिजायला हवं....आभाळभर...!!


हसायला हवं.....भिजऱ्या डोळ्यांनी...
आभाळाचं गाणं ....
गच्च पांघरून....अंगभर....!!


पण....
असं काहीच नाही होत ......
रस्ताभर पाऊस येवूनही...
मा्झ्या पसाभर आंगणात....
उन्हाची ओरड ....


अन्‌...
तन गच्च भिजलंय़...
तरीही....
मनाला युगोन्‌यूगे....
पडलेली तीच ती....
अधाशी कोरड...!!


----चैताली.

06 May 2010

स्वप्नाळले.....!!

गुंतले तुझ्यात....
तुझ्यात भुलले...
मिळवण्या तुला...
वेडावले.....!!


मदीर श्वासात...
श्वासात भिनले..
समेटता तुला...
सुखावले.....!!


जपले मनात...
मनात गुंजले...
गुपित आपुले...
उसासले.....!!


घे ना जवळी ...
जवळी राहुदे.. ...
आठवात तुझ्या
स्वप्नाळले.....!!



----चैताली.

26 April 2010

नूरलेच मी....!!

पुन्हा एकदा....
झाले बावरी....
तुझ्या भासांनी....

धावले मग...
विस्कटल्या....
रुद्ध श्वासांनी......!

विरघळले...
वळणातल्या....
रम्य वाटांनी.....

भानावले मी....
मग उजाड....
भग्न रस्त्यांनी.....!

आतापर्यंत...
भिस्तच होती....
त्या शब्दांवर...

राहिले काय...
माजले फक्त...
अवडंबर.....!

वाटते आता....
न स्फ़ुरले मी....
विरलेच मी...

स्वप्नात तुझ्या...(अन्‌)
जीवनी माझ्या...
नूरलेच मी....!!



-----चैताली.

22 March 2010

राहूदे तुझ्याकडे.....!

आहे तरी काय माझ्या कवितेत...
काही काटेरी धुमारे...
काही चटके... विझते निखारे...
राखभर विस्तव....
अन निखालस कटू वास्तव...

पसाभर चांदण्या....
हिरमुसला चंद्र....
एखाद्या ढगाची उसनी सावली..
जी उगाचच...
सैरभैर आभाळभर धावली....

तरीही काही कविता....
राहूदे तुझ्याकडे.....
काही मनाशी ठेव जपून...
अन काही अंगणात ठेव पुरून.....!

जास्त काही लागणारच नाही...
एखाद्यादिवशी मनात झुरशील...
असतील-नसतील तेवढे उमाळे लपवशील...
दिसलंच तर जप डोळाभर..
माझं ओलं मन...

पाकळीही उमलणार नाही...
वाढेल कदाचित तुझ्या अंगणात....
फक्त ..फक्त खुरटं तण.....!!




---चैताली.

02 March 2010

अंगभूत वळणं..!!

तुलाही मी तशीच हवीय ना...

तुझ्या साच्यात ढाळलेली...

पण मग माझा कोरीवपणा....??

नसा-नसात भिनलेला ठाशीवपणा...??

कशी विसरू...

माझ्यात भिनलेली भिन्नतेची लय...

माझं माझ्याचभोवती असलेलं बिलोरी वलय...

तुला आवडतं ना....

तुझ्या डोळ्यात माझं विरणं....

माझं तुझ्यातलं डोलणं..

पण मग कसं थांबवू...

विचारांच्या झोक्याची दोलनं..

अंगाखांद्यावर आत्ता-आत्तापर्यंत...

मिरवलेलं ’स्व’त्वाचं लेणं......

तशीही मी तुझीच आहे रे..

पण मग...

कुठे अडगळीत नेवून टाकू...??

साधी-सरळ असली तरीही..

माझी... 'माझी'...

अंगभूत वळणं..!!

                         ---चैताली.

15 February 2010

नभनक्षी

कड्याशी...
हवा समुद्राळलेली...
सुर्याची...
ऊब आता डूबलेली...


किंचित....
ढग जरा रेललेला....
ओळीत...
पक्षी एक चुकलेला..


भरती....
सांजेला तूझ्या सयीची...
उरली...
नभनक्षी आठवांची...


सांभाळ.....
तुच वेड्या ह्या जीवाला...
आभाळ...
तुच माझ्या समुद्राला....!!



--चैताली.

06 January 2010

अस्सं झालंय झाड माझं.....
पानोपानी बहरलेलं...
उमलता-उमलता डवरलेलं....
उगाचंच बावरलेलं...

हात हाती घेता...
मन लागले नाचू....
स्पर्शात अशी तुझ्या...
काय आहे जादू...
कळी-कळीने आता...
स्वप्नं नवं ल्यायलेलं..
अस्सं झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं... ॥१॥


ओठांवर माझ्या...
खट्याळ तूझे हासू...
मी तूझीच.. तू माझा...
नको ना असा रुसू...
थरारल्या मना...
आताच सावरलेलं...
अस्सं झालंय झाड माझं..
पानोपानी बहरलेलं... ॥२॥


आताशा मी जरा...
सावरून रहाते...
फूलले मी तरीही...
सुगंध आवरून घेते...
सळसळ पानांना ...
कितीदा रागावलेलं...
असां झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं.... ॥३॥



---चैताली.

एक परी.........

In my dreams....
वाऱ्यावरी...
आली एक परी...वाऱ्यावरी...
मन माझे घेवून गेली....
मनात ती..तनात ती..
आहे का खरी....सांग तरी...!!
एक परी......एक परी...!!


In one glimpse......
झाली चोरी....
हृदयाची माझ्या...झाली चोरी....
जीवन नवे देवून गेली...
श्वासात ती....भासात ती....
शोधू आता तिला...कुठवरी..!!
एक परी.........

Don't leave me...
वाटेवरी....
सोडू नको अर्ध्या...वाटेवरी....
चालतील ना बहाणे..
हसण्यात तू...गाण्यात तू....
बोल ना..बोल....काहीतरी....!!
माझी परी....


----चैताली.