Translate

17 March 2013

हक्क



झोप न येणाऱ्या कारणांची...
एक नीटस,सुबक वही करावी...
आणि अर्घ्य करावी स्वप्नांना...
किंवा असंच काहीसं उलट सुद्धा...

आणि जरा डोळ्यांवर...
टक्क पापण्या ओढून..
अध्याह्रुत रेषा...
सतर्कतेच्या भिंती...
बाजूला सारून बघावं...

तेव्हा
काही वाटतंच आहे..
असं वाटेपर्यंत...
आपण बरेच पुढे येतो..
असण्याचे डोंगर ओलांडून..

मग
अश्या वह्यांच्या थप्प्या चाळाव्यात...
तर दिसतात कुठे कुठे...
समरसतेच्या खूणा..
ज्यांच्यावर...
हक्कही सांगता येत नाही...!

...चैताली.

करूणाभर

काळाची घड्याळं...
लावूच नये कपाळावर....
म्हणजे मग पुन्हाचे दु:ख...
आणि तेव्हाचे सुख..
ह्या दोन्हीच्या अंतरातली रुखरुख...
जाचत नाही...

निदान जगण्याचे परिमाणं मोजायला तरी...
मेंदूला बाहेर काढून हृद्याशी धरावं..
मग अश्या मानेपासून..मेंदूपर्यंतच्या...
ताठरलेल्या शीरा विसरल्या जातात..

हलके झालेले ...
स्वत:चे बधिर पाय...
देऊन टाकावेत..
चालत जाणाऱ्य वाटांना...
म्हणजे आभाळांची गल्लत होत नाही..

आणि मग दुसऱ्याच कुणाचे तरी
डोळे घेऊन फिरत रहावं चेहऱ्यावर...
म्हणजे आपण झरत रहातो..
.
करूणाभर का होईना...!

      ...चैताली.