Translate

29 February 2012

न लागणारं वेड...!

पायांना फुटलेल्या वाटा...
कुठेच नेत नाहीत...
उलट धमन्यांमध्ये शिरतात...
अन प्रसवतात... बधिरलेले मेंदू...
ज्यांवर उगवतात..
पंख फुटलेले डोळे...

असे पंख फुटलेले डोळे ... मग...
झेपावतात..दूर...पल्याडच्या क्षितिजांपार..
भरून आणतात तिथल्या आकाशांनी..
मंतरलेल्या भरत्या...
आणि घेवून येतात...
न लागणारं वेड...!

जे फक्त डाचत राहातं...
लागत कधीच नाही...
ते मूरेपर्यंत तरी...
वागवाव्याच लागतात...
शहाण्यासूरत्या पृथ्व्या...
अन चंद्र कोरणारे आकाश....!


      ....चैताली.

22 February 2012

अनुल्लेख....

कुठेच शिल्लक नसणे माझे..
असेच क्षुल्लक असणे माझे..
वाटांवरती चालताना...
सापडती भग्न...
अवशेष माझे...

असेच हकनाक रुसणे माझे...
असेच झाकोळ,विझणे माझे...
स्वत:शीही बोलताना...
श्ब्दांनी होणे
कफ़ल्लक माझे...

असे ’जरा’च दिसणे माझे...
असेच अस्फूट असणे माझे...
उरी फुटताना..
डोळ्यांनी होणे..
अपलक माझे...

असेच मुबलक नसणे माझे
असेच संदिग्ध संदर्भ माझे...
सापडतील फडताळांना...
फुटके तुटके..
अनुल्लेख माझे...!


   ....चैताली.

17 February 2012

मुजोरी...!



सांप्रत मर्यादांच्या आड दडलेल्या..
सांस्कृतिक वल्गना..
आताशा(?) मुजोरी करायला लागल्यात...
योग्य तिथे सुबक..देखणी वळणं घेणाऱ्या रेषा...
हवं तिथे त्रिमिती साधायला लागल्यात...
फोलपटं सरसकट सकसतेचा आव आणून..
फोफावायला लागलीत...
निर्मांध क्षण निर्बंध डावलून....
रान उठवायला लागलीत...
.
.
आणि पिंपळपानं बिचारी...
वंचनेच्या पारावर..
जाळवंडायला लागलीत...!

....चैताली.

15 February 2012

विल्हेवाट...!

तळहातावरचे काही बेसिक(?) प्रश्नं...
आणि खांद्यावरचे बरेचसे आगंतुक प्रश्न...
तेही असे की ज्यांना जराही सहन होत नाहीत...
सोप्या रातींची अवघड स्वप्नं....
घेवून मिरवावं लागतंच...अंगाखांद्यावर त्यांना...
काही लोंबकाळतात पापण्यांना...
तर काही ओठांवर फिरतात अधाशीपणं..
शोषून घेतात सारा उष्णावा...गिलावा..
श्वासांच्या बरोबरीनं...!

तोडते तटातट त्यांना...
बेसिक प्रश्नं तरी जरा हिरमोडतात..
पण हे आगंतूक प्रश्न..
पार विल्हेवाट लावतात उत्तरांची...
पुन्हा येवून गिरबटतात मला...
ओढत नेतात मला...
त्यांच्या अवकाशांमध्ये...
अन असे बिलगतात...
जणू काही माझाच एखादा अवयव असावा..
शोषतात रक्त बिक्त..इतके अनभिषिक्त...?
.
.
प्रश्नं आणि स्वप्नं काय...
साली सारखीच नतद्रष्ट...!

        ....चैताली.