Translate

30 September 2008

अश्रांत कहाण्या....!!!

प्रत्येकवेळी असंच होतं......
नादभरल्या डोळ्यांनी काही सांगायला जावं.....
अन्‌ तु शब्दांची किंतानं ओढून बसावं.....
मी उभं रहावं स्तब्ध झाडाप्रमाणं........
आणि तु मूळा-मूळांनी माझ्यात पसरावं....
मी फांद्या मागाव्या उसन्या...
तु नुसतं पानात हसावं...
मी श्वासांच्या कंपनतारांवर वाळत घालावं जगणं....
त्याचवेळी तूझं आयुष्याला बोलावणं....

असंच का होतं....सारखं-सारखं....
भिंगारला जीव श्रांत करून मी बसावं.....
अन्‌ तु आणावी परत स्वप्नांची लव्हाळं.....
बोलले नाही ओठांनी शहाण्या...
समजून घे ना....
उपशमल्या जीवाच्या....
अश्रांत कहाण्या....!!!


------चैताली.

26 September 2008

"गप्प-गप्प का......"

बरं झालं.......
माझ्या आभाळाला गेलेला तडा तूला दिसलाच नाही ते......
पण बघ.....सावर मला आधीच....
सोपं नाहि रे....नभांच्या तुटक्या रेषांवरून चालणं......
चांदण्या बोचतात....
आकाशाचे कोपरेे रूुततात.....
अश्या वेळी क्षितिजंही साथीला नसतात....
इंद्रधनुष्य तरी किती दिवस तोलणार आकाश....

म्हणून म्हणाले....बरं झालं....
माझ्या आभाळाला गेलेला तडा तु बघितलाच नाही ते....
नाहीतर म्हणशील मग.....
"गप्प-गप्प का......
एवढं काय आकाश कोसळलंय........!!"



------चैताली.

24 September 2008

ठाव माझा इथे नाही.....

का मी अशी....विसाव्याला....
शोधे उन्हाची सावली....
वरपांगी खेळ माझा
रंगमंची मी बाहूली

अशीच रे स्वप्नं माझी
असंच का रे जगणं
सारं सारं खोटं खोटं
माझं उसनं हासणं

क्षितिजावर मारते
वेड्या स्वप्नांच्या रेघोट्या
ठाव माझा इथे नाही
ह्या तर अंधूक रेषा

ठरलेल्याच आहे रे
माझ्या वाऱ्यातल्या दिशा
आलास तु अवचित
जरा जरा डहूळल्या

कल्पित श्वासांच्या ताना
बेगडीच वास्तवाच्या
मीच विसरे सारखी
स्वप्नं जगता जगता...

वाटे जाउ दुरवर
पल्याड रे क्षितिजाच्या
सारे राहतात जिथे
तिथे तूच अडकावा

तूही तिथे अडकावा...????


----चैताली.