Translate

10 May 2012

निष्पंख...!

साऱ्या प्रात:निष्ठा छातीपोटाशी घेऊन...
काहीजण...उभे आहेत..कळसांवर...झरोक्यांत...
तेजोवलयं सांभाळत...
साकल्याच्या दिशा लेऊन...
पाहत आहेत...
येणाऱ्या सूर्यांची वाट...

बाकी सारं स्तब्ध...
भिंतींचे चिरेही..नि:शब्द...
त्यांच्यात उगवलेलं एखादं...
पिंपळाचं झाड वाऱ्याशी बोलत आहे...
तेवढंच..

बाकी सगळ्यांकडे...रात्रंच...
त्या निद्रिस्तांच्या तर...
स्वप्नांतही नाहीयेत...
नि:संग पंखांच्या भाषा...

त्यांचं तर आभाळही...

निष्पंख...!


          ....चैताली.

काही पक्षी...

कोणी आलंच तर...
सांग मी नाहीये म्हणून...
माझ्यातले काही पक्षी...
दूर गावा गेलेत...
आकाशांदरम्यान त्यांनी..
पसरलेले पंखच...
आता माझ्या डोळ्यांत उतरले आहेत...
.
पुन्हा ओळख-बिळख
शोधत बसतील...
माझ्या बिन-चेहऱ्यावर लोक...

(माझी काही पीसं...
ठेव मात्र जपून...!)


      ....चैताली.