Translate

24 April 2014

.पुरातन.




काही पुरातन भग्न अवशेष...
वस्तीला असतात...
वाहत असतात ते आपल्यात..
कळसावरील झेंड्यासारखे....
संन्यस्त रंग घेऊन...

वाटतं
सुटलोय आपण...
पण कुठूनतरी येऊन
गाठतात हे चिरदु:खं 
आणि मिसळतात पेशींमध्ये.....

बऱ्याचदा
आपलीही नसतात
कदाचित परस्थ...त्रयस्थ ...
तीच उजळवतात...
आपल्याल आतून...

आणि देतात सोनेरी रज:कण..
आपल्या नस्तित्वाला....
     .....चैताली.

.तरल.





अंधारात वारा पिताना
आलेली नशा..
रोमांच होता होता...
रंध्रांध्र निरवते...

आता इतकं
तरल
होता येणारच नाही कधी...
असं म्हणत मी...

ओंजळभर...
समुद्र शिंपडते स्वत:वर...
किनाऱ्यावर थिजलेली निळाई...
रुजवते हळव्या तळव्यावर...

आणि
कवितेचे चंद्र
ओढून घेते
अलवार पापण्यांवर...

    ...चैताली.

31 March 2014

.दशा.





आपण तरी...कुठल्या
देशांच्या दिशा सांगत असतो...
इहलोक ऐवजी अहंलोक
तळपायाची कातडी
निबर झाली तरी
न चालणारे आपण..
बुटांऐवजी
त्या कातडीचा वापर झाला
तर बरं असा कातडीबचाऊपणा...
आणि
मेंदूची शकलं होईपर्यंत
शक्कल लढवणारे...
डोळ्यांच्या भगदाडात
शिरून भिंती बांधणारे..
मन:स्थितीच्या
मनोराज्यावर भाळणारे
भुवयांमध्ये भूलभुलैया
शोधणारे चक्करचक्र
मृगजळाच्या आशेपायी
उन्हात
डोळे झाळणारे...
कवितेसारखेच
चमत्कृतिपूर्ण
शब्द वापरून
स्वतःला चंपक बनवणारे
आपण..खरंच...
कुठल्या मन:देशांच्या
दशा सांगणार असतो...???

      ...चैताली.

23 March 2014

.धाव.



धावत्या रस्त्याबरोबर
सुस्साट सुटताना...
वाराही मागे पडतो

मी बनते त्या
वेगजन्य रस्त्याचा एक भाग...

इतकंच
जाणवत असतं...
जात राहायचं असतं
प्रकाशाच्या रेघांना
मागे टाकत

मात्र एकाएकी आतून
स्तब्ध होते मी...
जाणवतं

पोहोचण्याचं ठिकाणच
माहीत नाही आपल्याला

मी थांबते
वारा थांबतो..
रस्ताही थांबतो....!!

       ...चैताली.

.बुद्ध.



थकलेल्या शरीरानिशी...

निजाळलेल्या पावलांनी....

शोध सुरु राहतो

रात्रभर...



तेव्हा

अस्वस्थतेचे पाढे

आणि न निजेचे स्तोत्र..

ह्यांचा मेळ घालत..



मानलेल्या दु:खांचे

रकानेच्या रकाने

डोळ्यांवर रेखून...



काही स्वप्नं

स्तब्ध बसतात उशाला

बुद्ध बनून...

  

 ...चैताली.


02 March 2014

.तू जाणून घे.



तू जाणून घे...
माझ्या नसण्याच्या कक्षा..
म्हणजे लिंग ,संज्ञा, जगणं-मरणं,
भरकट बनून फिरतील अंतराळात..

जगण्याची व्यवधानं बाजूला ठेव..
तारतम्य बाळगणारे विभ्रम
अंगीकृत करू नकोस...
म्हणजे आपोआप वेध घेता येईल
उल्हाळत्या नक्षत्रांचा...

निश्चल हातांनी
तुझे अंधार माझ्या
तेवत्या डोळ्यांभोवती धर

मग
चेहरे किरमिजून गेले
तरी चालतील...
माझं नसणं झळाळेल
बघ तुझ्या ओंजळीत

....चैताली.

17 February 2014

उसनी माती



पाय कच्चे आहेत माझे
तेव्हा घ्यावी लागते
उसनी माती वाटेकडून

मग विरघळतात पाय...
होतात तन्मय वाटचालीशी
निथळते
आकाश खांद्यांवरून...

चालताना हात पसरते..
कवेत घेते
अस्तित्वाचे परीघ
सप्तगात्रांनी बरळते
नसण्याच्या असंबद्ध कविता...
भ्रमांचे जाहीरनामे
लिहिते झाडांच्या पाना-पानांवर..

निरखते स्वतःला
लख्ख आसमानी आरशांमध्ये
आणि रचते तोडमोडून पुन्हा पुन्हा

मात्र पेशींची एकही मात्रा
जुळू देत नाही शरीराशी..

आणि तसेच अपरिपक्व ठेवते
अशब्द लागेबांधे
.....धमन्यांमध्ये

...चैताली.