Translate

04 November 2015

.एकटेपण.


ती जरा बिचकत गर्दीमध्ये घुसते
तिचं एकटेपण तिच्याबरोबर ॲटीट्युड जपत


प्रत्येकाबरोबर ज्याचं त्याचं एकटेपण आहे हे बघून
कोलाहलात घुसल्यावर तिला बरंही वाटतं


“Why here? Let’s sit alone na..”
एकटेपण तिच्या डोक्यात त्रासिक कुजबुजतं

ती हातातलं पुस्तक त्याला दाखवत म्हणते
‘Don’t worry, you are not depressive like them.
You have got company”


मग तिचं एकटेपण स्वत:ला वेगळं समजून
प्राऊडली हासत पुस्तकाच्या पानांवर पसरतं


रेड स्लीवलेस एकटेपण
गळ्यातल्या पाणीदार मण्यांइतक्या
मोठमोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत असतं

कोटाच्या खिशातलं त्रिकोणी एकटेपण तसं देखणं
पण गिल्टफुली खाली मान घालून बसून राहतं


हाय हिल्स घालून,टोटबॅग मध्ये बसलेलं
हरवलेल्या मांजराच्या पिलागत केविलवाणं

कानात इअरप्लग्ज घालून यलोशूजवालं एकटेपण
स्वत:ला सोशल साईटवर झुलवत असतं 


भिंतीवर असलेलं कॅनव्हासवरचं कलरफुल एकटेपण
आर्टिस्टकडे पुन्हा जाण्यासाठी अधीर

हावरटपणे सिगरेट ओढताना
भसाभस धूर सोडणारं भकास
फिरत्या खुर्चीवरचं किरकिरं
स्वत:चा आस आणि आब जपत


तिला वाटतं चला आता तरी
आपलं एकटेपण बोअर नाही होणार
पण कोणीच आपलं एकटेपण एकटं सोडत नाही


शेवटी
कौन्सेलिंग क्लिनिकमधून घरी जायच्या वेळी
तिचं एकटेपण
रोजच्या निर्दयीपणे
तिचं विशफुल थिंकिंग पायानं ठोकरुन
तिला ओढत घेवून जातं...

....चैताली.

No comments: