Translate

31 May 2009

आकाशसांधणी...!!!

एकाही रातीची चौकट पूर्ण नाही....
त्यामुळे तीच्या साच्यात ओतलेली स्वप्नंही अपूर्णंच....
आधी ह्या स्वप्नांचे साचेच साजेसे करून घ्यायला हवेत...
पण मग एक-एक कोन सांधण्यासाठी....
लांबलचक श्वासांची दोलनं....
अन कैकदा त्या स्वप्नांशी असंबद्ध बोलणं...

आता पून्हा तेच करणं आलं....
स्वप्नांसाठी रातीची मनधरणी..
मूर्त स्वप्नांसाठी अमूर्त साच्यांची नव्याने बांधणी....
नव्या दिवसाची नव्या सूर्याशी....
आकाशसांधणी...!!!



----चैताली.

26 April 2009

तुमच्याकडे असलेलं आकाश......!!!

जास्त काही बोलत नाही...
आकाशाशी असलेलं नातं मी चांदण्यात मोजत नाही...
जरा बिचकतंच गोळा करते..... विचारांचे कवडसे..
अन प्रकाशून स्वत:ला लगेच विझवते....
आकाशाचं काही वाटत नाहीच मला....
पंखांखाली लपवून फिरते मी ते....

तुमच्याकडेही असतील काही आकाशाचे तुकडे....
बसा जोडत आणि सांधत....
एखादा नाही सापडला तर या मग मागायला उसना...
देता येणार नाही मला...
सात आसमानं मिळून माझा एक पंख बनलाय...

सांभाळा...
तुमच्याकडे असलेलं आकाशही.....
एखादं पीस असेल....
माझ्याच पंखातून....
निसटलेलं.....!!



----चैताली.

07 April 2009

विषवल्ली...!!

अंधारकडे तोडून.
मी प्रकाशाकडे धाव घेण्याचा प्रयत्न करते....
पण परत तिथेच उभी हे बघून...
मुळं सावरतानाच उन्मळून जाते....
स्वत:ला हाका घालताना...
ठार बहिरी होते...
अदृष्याचं कफन ओढून...
माझे मी पण[?] जाळते..
थंडगार मृत्तिकेतून...
अस्थीकण शोधते...
मृत्युपत्र लिहिताना पण का मी...
शेवटच्या पुर्णविरामात घुटमळते...

मोह न कसला म्हणताना..
मिरवते"मी" पणाची बिरुदावली...
अन मग अमृतवेल शोधताना मीच होते....

विषवल्ली...!!


-----चैताली.

05 April 2009

जीव जडल्या भेटींना....

जीव जडल्या भेटींना....
नयनांत साठवते...
हरवू नये म्हणून...
आसवांना थांबवते...

असा का जडतो जीव...
असाच का वेडावतो..
आठवांच्या सावल्यांना...
उराशी कवटाळतो...

जपते वेडयासारखी
सख्या कुजबुज मनी..
रुणझूण शब्द तुझे..
अन माझ्यातली गाणी...

हरवले गाणे जरी...
शब्द जपते तुझे मी..
मी आहे तिथेच उभी...
तु साद घाल कधीही...

परतून येताना तु...
हासणं माझं आठव..
वेड्या आसवांना माझ्या...
माझ्याकडेच पाठव...



----- चैताली.

30 March 2009

चित्रासारखं....!!!

रात्री पुन्हा मी टक्क जागीच....
स्वप्नपुर्तींचे विकल्प आणि...
उर्जितावस्थेतले संकल्प...
उशाशी घेवून...
पहाट होताच एक-एक स्वप्न..
मी जगण्याच्या चौकोनात टाकून बघितलं...
ठिक्करपाणी खेळताना टाकतो तसं...
मग स्वप्नं उलगडायला लागले...
आभास आणि सत्य ह्यांचा टकराव होवून...
टवके उडायला लागले...जगण्याचेच...
उन्हाच्या झळा आणि त्यांना अडवणारा पडदा...
ह्यांच्या खेळात सावलीच बिचारी होते तसंच काहीसं...

आता नकोसं वाटतं...
प्रत्येकवेळी..
अपेक्षांची जंत्री घेवून उभं रहायाला..
आंतर्मनावर बहि:स्थ वृत्तीने बहिष्कार घालेन म्हणतेय...
म्हणजे सारं जीवनच देखणं होईल...चित्रासारखं...
आणि मी ही जगेन चित्रासारखं....!!!



----चैताली.

26 March 2009

.....नको दुभागणं.....!!

मी बंद केलं स्वत:च...
स्वत:ला मांडणं....
सोपं नव्हतंच कधी..
मनाला फेडणं....


आतापर्यंत काहीच...
बोलले मी नाही....
जमलंही नाही मला...
मुक्याने मागणं...


निस्तरणे शक्य नाही...
हे शाप-उ:शाप...
का जीवन-दोरीवर...
उगाच दोलनं...


किरमीजी दु:ख माझं...
डॊळ्यात राहीलं.......
दिसेना तेजपिसांची...
ती स्वप्नंउड्डाणं....


विकल गात्रांनी किती...
दु:ख उजवणं...
फरफट नको आता...
नको दुभागणं...



.....नको दुभागणं.....!!



----चैताली.

17 March 2009

थोडं उरावं.....!!

स्वत:लाच असुया वाटावी इतकं काही .....
हाती असताना...
एक करायचं..सारं काही लखलख...
चमकत असताना...
खोल नि:श्वास सोडून पळभर उभं रहायचं...
चमचमणाऱ्या ताऱ्यांना हातांनी दूर सारायचं...

तेव्हा त्या झगमगाटापासून दूर दिसतात... काही चेहरे...
आपली वाट पाहणारे......
आपण पुढे जावं म्हणूनच.....
आपला हात सोडलेले...

त्यांच्या डोळ्यातली चमक.....
हेच तर आपलं यश असावं...
पण ती चमक विझून जायच्या आत...
आपण दोन पावलं मागे फिरावं...
आकाश तर आहेच आपलं...
पण त्या आपल्यांसाठी....
कधी-कधी....
परत फिरावं...

थोडं उरावं.....!!



----चैताली.