Translate

Showing posts with label जरा तालात. Show all posts
Showing posts with label जरा तालात. Show all posts

28 September 2012

नको लाऊन घेऊस...

नको लाऊन घेऊस...
दु:खं माझी जिव्हारी....
घेऊन फिरशील डोळ्यांत...
गच्च स्वप्नंलव्हाळी...

माझ्या अश्रूंना...

देवू नकोस थारा...
घेऊन फिरशील साथीला...
मग कोण रौद्र वारा...

माझ्या पापण्यांना...

देशी खांद्यावरी विसावा...
घेऊन फिरशील हृद्याशी...
.
.
मग अवकाश सारा....!

....चैताली.

22 February 2012

अनुल्लेख....

कुठेच शिल्लक नसणे माझे..
असेच क्षुल्लक असणे माझे..
वाटांवरती चालताना...
सापडती भग्न...
अवशेष माझे...

असेच हकनाक रुसणे माझे...
असेच झाकोळ,विझणे माझे...
स्वत:शीही बोलताना...
श्ब्दांनी होणे
कफ़ल्लक माझे...

असे ’जरा’च दिसणे माझे...
असेच अस्फूट असणे माझे...
उरी फुटताना..
डोळ्यांनी होणे..
अपलक माझे...

असेच मुबलक नसणे माझे
असेच संदिग्ध संदर्भ माझे...
सापडतील फडताळांना...
फुटके तुटके..
अनुल्लेख माझे...!


   ....चैताली.

30 May 2011

फूलांच्या गावात...!!

फूलांच्या गावात...
पाकळ्या-पाकळ्या...
पानांच्या गल्लीत...
हरखती कळ्या...

फूलांच्या गावात...
वाराही अत्तर...
स्वप्नाळू प्रश्नांना...
सुगंधी उत्तर...

फूलांच्या गावात...
रुसावे न कोणी...
हळूच हसावे...
पाणेरी डोळ्यांनी...

फूलांच्या गावात...
पायांनी न यावं...
वाटांनी नूसत्या...
हृदयानं चालावं...

फूलांच्या गावात....
येता (अ) मानुष....
फूलांच्या ठश्यांनी...
होईल फूलांची...

.....फसवणूक....!


        ---चैताली.

17 September 2010

सांग न सखया..

रडले परि...
भिजले न थेंबभर...
....
बोलले परि...
उमटले न कणभर...
....
सांग न सखया...
कुठेशी घेऊन जाऊ...
शब्दांचे अवडंबर....!


उमलले परि...
गंधाळले न पाकळीभर....
....
स्वप्नाळले परि...
निजले न पापणीभर...
.....
सांग ना सखया...
कुठेशी घेऊन जाऊ...
चांदणं आभाळभर...!


तेवले परि...
उजळले न ज्योतभर..
....
चालले परि...
पोहोचले न पाऊलभर...!
....
सांग न सखया..
कुठेशी निघून जाऊ...
वाटाच आंगणभर...!

            -------- चैताली.

26 April 2010

नूरलेच मी....!!

पुन्हा एकदा....
झाले बावरी....
तुझ्या भासांनी....

धावले मग...
विस्कटल्या....
रुद्ध श्वासांनी......!

विरघळले...
वळणातल्या....
रम्य वाटांनी.....

भानावले मी....
मग उजाड....
भग्न रस्त्यांनी.....!

आतापर्यंत...
भिस्तच होती....
त्या शब्दांवर...

राहिले काय...
माजले फक्त...
अवडंबर.....!

वाटते आता....
न स्फ़ुरले मी....
विरलेच मी...

स्वप्नात तुझ्या...(अन्‌)
जीवनी माझ्या...
नूरलेच मी....!!



-----चैताली.

06 January 2010

अस्सं झालंय झाड माझं.....
पानोपानी बहरलेलं...
उमलता-उमलता डवरलेलं....
उगाचंच बावरलेलं...

हात हाती घेता...
मन लागले नाचू....
स्पर्शात अशी तुझ्या...
काय आहे जादू...
कळी-कळीने आता...
स्वप्नं नवं ल्यायलेलं..
अस्सं झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं... ॥१॥


ओठांवर माझ्या...
खट्याळ तूझे हासू...
मी तूझीच.. तू माझा...
नको ना असा रुसू...
थरारल्या मना...
आताच सावरलेलं...
अस्सं झालंय झाड माझं..
पानोपानी बहरलेलं... ॥२॥


आताशा मी जरा...
सावरून रहाते...
फूलले मी तरीही...
सुगंध आवरून घेते...
सळसळ पानांना ...
कितीदा रागावलेलं...
असां झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं.... ॥३॥



---चैताली.

05 April 2009

जीव जडल्या भेटींना....

जीव जडल्या भेटींना....
नयनांत साठवते...
हरवू नये म्हणून...
आसवांना थांबवते...

असा का जडतो जीव...
असाच का वेडावतो..
आठवांच्या सावल्यांना...
उराशी कवटाळतो...

जपते वेडयासारखी
सख्या कुजबुज मनी..
रुणझूण शब्द तुझे..
अन माझ्यातली गाणी...

हरवले गाणे जरी...
शब्द जपते तुझे मी..
मी आहे तिथेच उभी...
तु साद घाल कधीही...

परतून येताना तु...
हासणं माझं आठव..
वेड्या आसवांना माझ्या...
माझ्याकडेच पाठव...



----- चैताली.

09 March 2009

मन झिम्माड झिमाड.....

मन झिम्माड झिमाड..
असं अल्याड-पल्याड..
रंगवतं दाही दिशा.
असं झालंया उनाड...

मन भिल्लाचं पोर..
लावी जीवाला गं घोर...
धुंडाळतं दाही-दिशा...
अश्या खोड्या शिरजोर....

मन वेल नाजूकशी..
सुखी पानांची नक्काशी...
दुखावतं फूलांमध्ये..
होता पानगळ अशी...

मन बिल्लोरी आईना...
त्यात जगणं माईना...
पालवते साऱ्या आशा......
नवं स्वप्न चेहेऱ्यांना..

मन निघता प्रवासा...
जणू चोर-कवडसा...
प्रकाशून दाही दिशा...
होत जाई पुसटसा...

मन किनखापी रात...
चांदण्यांची गलबतं....
चमचम त्यांची भाषा...
वाऱ्यावर खलबतं...

मन रांगडा साजण....
असं प्रेमाला उधाण...
सुखावतो अंगोपांगी...
माझं खोटंच गाऱ्हाणं...



---चैताली .

02 March 2009

नसताना तु इथे भास रे अधे-मधे....
जीवनगाण्यातूनी नादणे कधी कधी....

गुंगल्या नयनात स्वप्न होऊन वसे..
तूझ्या नजरेत हासू वेचणे कधी कधी...

जाणीले कधीचेच,पण दाविले नाही..
नकोच स्वप्नं-घुंगरू,वाजणे कधी कधी

संवाद हा चालतो,पापण्यांचा गालाशी....
भासांत स्पर्शताना,नाहणे कधी कधी...

मग फूलांना येतो,गंध साजणा तूझा...
जरी पाकळ्यांचे त्या,भाळणे कधी कधी...

नजर नजरेत मिसळता,वेडीपिशी जाहले..
गुलाबी वेडात त्या ,रमणे कधी कधी....



----चैताली.

03 February 2009

माझ्या बाहूलीचे......

माझ्या बाहूलीचे......
सोन सानूलीचे.....
स्वप्न अलवार....
पापणीत....

चंद्र त्या चांदण्या....
मागशी गोंदण्या....
सांभाळ हातात....
हलकेच....

इकडून येते....
अशी मुरकते...
नाचते डौलात...
आंगणात......

तूझ्या फिरकीने...
गोल गिरकीने....
हासू कौतुकाचे...
विसावते...

बोलणे तोऱ्याचे...
हात नाचवते....
डोळ्यात विभ्रम...
जादूचेच....


जाशील उडून....
पंख पसरून....
अनादि आकाश....
तूझ्यासाठी.....


दिसता उदास...
माझ्यात हासते....
मलाच तु अशी...
सांभाळते....

मलाच तु अशी....
सांभाळते....!!!



-----चैताली.

23 January 2009

आसूंच्या पल्याड.... देखणं हासणं...

आखल्या रेषेत...... रेखलं चालणं....
आसूंच्या पल्याड.... देखणं हासणं...

इवलं आभाळ.... आढ्याला टांगणं....
कधीचं जगते.... चौकटी जगणं...
घेताना भरारी.... काचली काकणं....
आसूंच्या पल्याड.... देखणं हासणं..... ||१||


पिंपळ पानाचं..... जाळीला जपणं....
आयुष्य रेषांच्या.... जाळ्यात सुकणं.....
सांभाळ साजणे..... रान हे उसनं.....
आसूंच्या पल्याड.... देखणं हासणं......||२||


चांदणं विरता..... उन्हाचं गोंदणं.....
जून्याच आभाळी.... चंद्राचं झुरणं....
सांभाळ साजणे.... पंखांचं रुसणं.....
आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....||३||


-------- चैताली.

15 January 2009

राती लपविल्या मी............

नशिल्या नजरेने, खळ्यात हसतांना
बोलले मौनातुन, डोळ्यात असतांना

मिलनाच्या रातीत, दिठीत झुलतांना
शब्द मंतरलेले, बोलत असतांना

लख्ख चांदण्यांतुन, प्रकाश वेचतांना
चंद्र विझवले मी, नशेत असतांना

गंधीत झाले श्वास, मोगरा फुलतांना
झाली पहाट ऐसी, धुंदीत असतांना

ओठांच्या मिठीतुन, आल्हाद सुटतांना
राती लपविल्या मी, दोघे बहकतांना


---चैताली.

22 November 2008

हास्याची का मखलाशी....

का उगा डोळे भरून येती....
हास्याची का मखलाशी....
उन्हावला जीव आता....
उभी सावलीत कशीबशी....!!

कोण गं हा खटाटोप सारा
जगणं दाखवण्याचा....
आंजारून गोंजारून...
पून्हा आभाळ सावरण्याचा....!!

ताटकळत ह्या राही उभ्या...
माझ्या ऐकून कहाण्या...
राती प्रहररेषेला....
सुस्कारती चित्तरचांदण्या....!!

नको मोहोर...नको बहर...
पानगळीच्या साथीला....
घालून ह्या येरझारा....
आज ऋतू सारा खंतावला...!!

कुठे कुठेच रमेना आज....
भ्रमावल्या खूळ्या आशा.....
गमतील कधी मला....
विद्ध पंखांच्या नि:संग भाषा.....!!

का उगा डोळे भरून येती....
हास्याची का मखलाशी....!!!


-----चैताली.

11 November 2008

एकटी मी....एकटी मी.....

एकट्या रातीनं...
चंद्राच्या साथीनं.....
चालत मी राहते...
माझी एकलीच वाट....
सांगते वाऱ्याला...
नभीच्या ताऱ्याला...
दे ना रे.....साथ....
एकटी मी...एकटी मी....॥१॥


इतक्या घाईनं...
धूक्याच्या साथीनं...
वेगळी मी वाहते....
हि असली आडवाट....
सांगते वाऱ्याला....
नभीच्या ताऱ्याला....
दे ना रे......साथ....
एकटी मी..... एकटी मी....॥२॥

कोवळ्या गाभ्यानं....
रानाच्या साथीनं...
घुमत मी राहते....
अवघड अस्सा घाट....
सांगते वाऱ्याला....
नभीच्या ताऱ्याला...
दे ना रे ......साथ....
एकटी मी....एकटी मी.....॥३॥



-----चैताली.

24 October 2008

ही श्वासांची पावरी....

सुगंधाच्या लेवून लाटा
अश्या बेभान रे वाटा
कोण हा आला बाई...

श्वास बहकले माझे ....
मी राहिले ना माझी...

लाजऱ्या नजरेच्या काठा....
सांजा धुंदावल्या माझ्या....
ही श्वासांची पावरी....

पाय थिरकले माझे...
मी राहिले ना माझी.....

साऱ्या नजरेच्याच बाता.....
त्याच गाथा,त्याच राता....
काय हा सांगू पाही....

नैन बिथरले माझे.....
मी राहिले ना माझी....



-----चैताली.

वेंधळी... धांदल...

ये ना तु सख्या...


भिजताना...
टप्पोर थेंबात...
नि:शब्द तुझ्यात...
बोलताना...


हासताना...
मध्धाळ उगाच...
रोमांच हळूच ...
लाजताना...


भिनताना...
वेल्हाळ श्वासात...
गंधाळ वाऱ्यात...
फुलताना...

श्श्श्श....!!
जपताना...
गुपित मनात ...
बाई...बाई...!!
वेंधळी... धांदल...
चालताना...!!



----चैताली.

06 August 2008

रात उमलत जाते....

पाकळ्यात अंधाराच्या
रात उमलत जाते....
डोळा अंधार झालर
काहूरते....!

उगा आणतो वारा
गीत दवाळ क्षणांचे....
अंधारगच्च जमीन
स्वप्नाळते....!

पहाटेच्या त्या वाऱ्याला
सांजचाहूल लागते....
शुक्राची चांदणी उगा
खिन्नावते....!

नाही भिजलया वातीला
साथ वेड्या ठिणगीची....
दिवाळसणाला ज्योत
खंतावते....!

किती रात ती चालावी
कुरतडलेली वाट....
सोनेरी स्वप्नात टाच
भेगाळते....!

नाही चांदणपहाट
त्या रातीच्या नशीबाला....
सांभाळ मुठीत व्रण
काजव्यांचे....!!!




-----चैताली.

04 July 2008

आभाळभरून हळव्या सरी......

आभाळभरून हळव्या सरी...
कशी जाऊ सख्या सांग मी घरी..



वाटेतले पक्षी गजबज झाडा...
रंग हिरवा आला साजूक पंखाना...
रेंगाळू लागल्या तीन्ही सांजा..
रात साजे चांद डोक्यावरी...
आभाळभरून हळव्या सरी.....
कशी जाऊ सख्या सांग मी घरी..

रंग फुलपाखरी मनाला तुझ-माझ्या...
पावसाचं वेड.. अश्श्या हिरव्याकंच लाटा...
मोहोरून गेल्या राती साठवून थेंबा...
झाल्या वाटा आज रानभरी....
आभाळभरून हळव्या सरी...
कशी जाऊ सख्या सांग मी घरी..

मनातले मी सारे जाणते तुझ्या...
न्याहाळू नको असा भिजल्या अंगा...
रंगते मी अशी तुझ्या रंगा...
लाज वाटे साज तुझा ओठी ...
आभाळभरून हळव्या सरी.....
कशी जाऊ सख्या सांग मी घरी..

-----चैताली.

27 June 2008

जागे रान...जागे भान....!!!

जागे रान...जागे भान....
निजल्या पापण्यांत माझं भिजलं गान....
शोधती वाट दवबिंदू पावसात....
असल्या घायाळ रातीनं....
प्रीत जपावी किती बेभान...
जागे रान......जागे भान.....!

वाजे बासर.. असा जागर..
एकल्या पानावर हिरवी झापड....
हरवली तान खुशाल रानात....
असल्या घायाळ रातीनं....
सूर जपावे किती बेभान...
जागे रान......जागे भान.....!

नाचे मन ....मोहरे तन....
पावसाच्या रेघात स्वप्नांची पखाल..
चेतली ठिणगी पाण्याच्या वेडात...
असल्या घायाळ रातीनं....
वन्हि जपावा किती बेभान....
जागे रान.....जागे भान.....!


-----चैताली.

08 May 2008

माझ्या कवितेच्या पानावर

माझ्या कवितेच्या पानावर
चालणारी मुंगी काळी
घेवुन चालत होती
आठ्या चार कपाळी

शब्दा-शब्दात अडकली
अल्प विरामा थबकली
टोकदार शब्द येता
जरा जरा चमकली

खरेच का माझी
तिला कविता कळली
मागे पुढे होत
मान हलवित म्हणाली

पांढरयाच केलं काळं
आहेना सारं आलबेल
सांगते तुला काही
छान आपलं जमेल

नक्की शोधते माझ्यागत
तुही जिणं कण-कण
वेचतेस ना बाई
शुभ्र साखर क्षण

जाते बाई चल
लिही तुझं-तुझं
आहे मला न्यायाचं
मेल्या मुंगीचं ओझं

जाता जाता बघून
कसं-कसंच हासली
कवितेत माझ्या तिची
इवली पावलं उमटली




----- चैताली.