Translate
29 April 2013
फिरती
टळटळत्या उन्हात...
हेल्मेट घालून निघाल्यावर...
मनात येतोच विचार..
ह्या रसरसत्या रस्त्यांनी
स्वत:ला गाठ मारली...
आणि पूलांनी उलटे झोके घेतले..
तर आपण कुठे जायचं...
सरसरून..फरफरून..
शहारते ह्या विचारांनी ...
अश्या बाधक विचारांचे..
सूर्य भाळी माळून..
आणि शहांऱ्यांचं शहर
शरीरभर घेऊन...
मी फिरतेच आहे अजून...!
.....चैताली.
श्वास...
कसाबसा घेतलेला...
नाका-तोंडातला श्वास...
गळ्यावाटे,फुफ्फूसाद्वारे होता होता...
अंगभर रुजावा तसा...
कधी-कधी...
एखादा भिनका विचार...
उमडतो हुंदका बनून पापण्यांवर...
अन गदगदून फुटतो अंगभर...!
---चैताली.
झाडं कोण असतात..??
झाडं कोण असतात..??
ती तिथेच उभी का असतात..
कोणाचं कोणीच नसल्यासारखी..!
ती इथली नसतातंच मूळी..
वाहत आलेली असतात पृथ्वी-औघात..
आपण जात-येत असत्तो फक्त..
त्यांच्या अस्तित्वाच्या परिघांमधून..
(ज्याला आपण रस्ता म्हणतो)
आपणच ऋतूंचा करार करतो त्यांच्याशी..
ती आपल्यातल्या बोन्सायला हासत देखिल नाहीत...
फक्त माना डोलावतात...
आणि आकाशाशी बोलत राहतात...!
....चैताली.
17 March 2013
हक्क
झोप न येणाऱ्या कारणांची...
एक नीटस,सुबक वही करावी...
आणि अर्घ्य करावी स्वप्नांना...
किंवा असंच काहीसं उलट सुद्धा...
आणि जरा डोळ्यांवर...
टक्क पापण्या ओढून..
अध्याह्रुत रेषा...
सतर्कतेच्या भिंती...
बाजूला सारून बघावं...
तेव्हा
काही वाटतंच आहे..
असं वाटेपर्यंत...
आपण बरेच पुढे येतो..
असण्याचे डोंगर ओलांडून..
मग
अश्या वह्यांच्या थप्प्या चाळाव्यात...
तर दिसतात कुठे कुठे...
समरसतेच्या खूणा..
ज्यांच्यावर...
हक्कही सांगता येत नाही...!
...चैताली.
करूणाभर
काळाची घड्याळं...
लावूच नये कपाळावर....
म्हणजे मग पुन्हाचे दु:ख...
आणि तेव्हाचे सुख..
ह्या दोन्हीच्या अंतरातली रुखरुख...
जाचत नाही...
निदान जगण्याचे परिमाणं मोजायला तरी...
मेंदूला बाहेर काढून हृद्याशी धरावं..
मग अश्या मानेपासून..मेंदूपर्यंतच्या...
ताठरलेल्या शीरा विसरल्या जातात..
हलके झालेले ...
स्वत:चे बधिर पाय...
देऊन टाकावेत..
चालत जाणाऱ्य वाटांना...
म्हणजे आभाळांची गल्लत होत नाही..
आणि मग दुसऱ्याच कुणाचे तरी
डोळे घेऊन फिरत रहावं चेहऱ्यावर...
म्हणजे आपण झरत रहातो..
.
करूणाभर का होईना...!
...चैताली.
लावूच नये कपाळावर....
म्हणजे मग पुन्हाचे दु:ख...
आणि तेव्हाचे सुख..
ह्या दोन्हीच्या अंतरातली रुखरुख...
जाचत नाही...
निदान जगण्याचे परिमाणं मोजायला तरी...
मेंदूला बाहेर काढून हृद्याशी धरावं..
मग अश्या मानेपासून..मेंदूपर्यंतच्या...
ताठरलेल्या शीरा विसरल्या जातात..
हलके झालेले ...
स्वत:चे बधिर पाय...
देऊन टाकावेत..
चालत जाणाऱ्य वाटांना...
म्हणजे आभाळांची गल्लत होत नाही..
आणि मग दुसऱ्याच कुणाचे तरी
डोळे घेऊन फिरत रहावं चेहऱ्यावर...
म्हणजे आपण झरत रहातो..
.
करूणाभर का होईना...!
...चैताली.
09 February 2013
चष्म्यावाला माणूस...
एक माणूस आलाय गावात....
डोळ्यांच्या जागी नुसता चष्मा असणारा.....
त्याचा चष्मा समोरच्या माणसानुसार बदलतो म्हणे...!
.
.
मग काय....
माणसं बिचकायला लागली त्याच्यासमोर यायला...
स्वत:लाच किती घाबरतात नं माणसं...???
मी ही गेले....
लिपस्टिक लावून... सेंट-बिंट मारून....
तर स्साला कोऱ्या चेहेऱ्याने म्हणाला....
"....चष्मा हरवलाय....!"
.
.
च्यायला.... शोधा स्वत:च स्वत:ला.....!!
आरसा आहे का हो कोणाकडे.....???
.....चैताली.
15 December 2012
सोन-उन्हेरी..
मनात कित्येक दिवस...
खुट-खूट वाजणारं काहीतरी...
मागे मागे ढकलत होते सारखं...
वाटलं असेल एखादी कविता...
माझ्याशी प्रामाणिक रहा म्हणणारी...
नाहीतर सलणारं एखादं असुख...
किंवा धावाधाव करताना..
सोयीस्कररित्या विसरलेलं...
रस्त्यावरचं रडणारं एखादं मूल..
किंवा मग स्पष्ट बोलता आलं नाही म्हणून...
स्वत:चीच केलेली कीव...!
शेवटी एक दिवस उचकटून बघितलंच सगळं..
तेव्हा दिसलं..
जगरहाटीच्या गडबडीत...
शांत होऊन..धुकं अनुभवत...
कसलाही उसना अभिर्भाव न घेता...
एकत्र बसून झोक्यावर...
मस्त आल्याचा चहा पिऊ म्हणणारं..
सोन-उन्हेरी..माझंच उबदार घर...!
...चैताली.
खुट-खूट वाजणारं काहीतरी...
मागे मागे ढकलत होते सारखं...
वाटलं असेल एखादी कविता...
माझ्याशी प्रामाणिक रहा म्हणणारी...
नाहीतर सलणारं एखादं असुख...
किंवा धावाधाव करताना..
सोयीस्कररित्या विसरलेलं...
रस्त्यावरचं रडणारं एखादं मूल..
किंवा मग स्पष्ट बोलता आलं नाही म्हणून...
स्वत:चीच केलेली कीव...!
शेवटी एक दिवस उचकटून बघितलंच सगळं..
तेव्हा दिसलं..
जगरहाटीच्या गडबडीत...
शांत होऊन..धुकं अनुभवत...
कसलाही उसना अभिर्भाव न घेता...
एकत्र बसून झोक्यावर...
मस्त आल्याचा चहा पिऊ म्हणणारं..
सोन-उन्हेरी..माझंच उबदार घर...!
...चैताली.
Subscribe to:
Posts (Atom)