Translate

06 January 2010

अस्सं झालंय झाड माझं.....
पानोपानी बहरलेलं...
उमलता-उमलता डवरलेलं....
उगाचंच बावरलेलं...

हात हाती घेता...
मन लागले नाचू....
स्पर्शात अशी तुझ्या...
काय आहे जादू...
कळी-कळीने आता...
स्वप्नं नवं ल्यायलेलं..
अस्सं झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं... ॥१॥


ओठांवर माझ्या...
खट्याळ तूझे हासू...
मी तूझीच.. तू माझा...
नको ना असा रुसू...
थरारल्या मना...
आताच सावरलेलं...
अस्सं झालंय झाड माझं..
पानोपानी बहरलेलं... ॥२॥


आताशा मी जरा...
सावरून रहाते...
फूलले मी तरीही...
सुगंध आवरून घेते...
सळसळ पानांना ...
कितीदा रागावलेलं...
असां झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं.... ॥३॥



---चैताली.

एक परी.........

In my dreams....
वाऱ्यावरी...
आली एक परी...वाऱ्यावरी...
मन माझे घेवून गेली....
मनात ती..तनात ती..
आहे का खरी....सांग तरी...!!
एक परी......एक परी...!!


In one glimpse......
झाली चोरी....
हृदयाची माझ्या...झाली चोरी....
जीवन नवे देवून गेली...
श्वासात ती....भासात ती....
शोधू आता तिला...कुठवरी..!!
एक परी.........

Don't leave me...
वाटेवरी....
सोडू नको अर्ध्या...वाटेवरी....
चालतील ना बहाणे..
हसण्यात तू...गाण्यात तू....
बोल ना..बोल....काहीतरी....!!
माझी परी....


----चैताली.

21 December 2009

ते बघ....!

च्यायला...!
आलीच पून्हा खुमखूमी....
हृदय उकरून काढायची...
नसा न नसा खरवडून...
वेदना-बिदना ओकायची...


स्स्स्स्स...!
पून्हा डहूळली...
सुकली जखम ठसठसली...
अणु-रेणूंनी फोडली...
अंधाधूंद किंकाळी...

ते बघ....!
पून्हा झालीच हजरजबाबी....
फूत्कारत पेशी न पेशी...
झूगारणया सारे सारे...
तटतटले मरण छातीशी...


च्च..च्च....!
पून्हा साकळल्या डोळ्यांनी....
बांधले संधान..अतृप्त वेदनेशी...
खरडली शिरगणती...
आत्म्यासह प्रेतांची........!!



---चैताली.

13 November 2009

आत्मविभोर....

उभी आहे कधीची....
हाती घेवून नक्षत्रांची राख...
मागतंय तेजपीसांची उड्डाणं..
माझ्या अखत्यारीतलं आकाश....

मागताहेत भररातीला अर्घ्य...
तेजोहीन...लोंबकाळणारे सूर्य...
घालत आहेत येरझारे गलीतगात्र चंद्र...
झीजलेल्या काही चांदण्या...
पाहतात वाट....उल्का बनण्याची...
अन लाटा शोधतात...कही विस्थापित समुद्र...
वसाहतींनी रंगलेले डोंगर...
फिरत आहेत रानोमाळ....
रणरणत्या वाळवंटाला....
साहवेना भरकटलं आभाळ...

काय करू ह्या साऱ्यांचं...
नाही सामावत माझ्यात आता....
सूर्याचं अखंड अग्निहोत्र......
नाही झिरपत चंद्राचं उच्चरवातलं..
चांदणस्तोत्र...

सारंच कसं बेअसर...
"मी"नाही आज माझ्याबरोबर.....
उभी निरीच्छ..अचल....अपलक .......

होऊनी आत्मविभोर....!!



----चैताली.

02 November 2009

हे ही नेहमीचंच ......

हे ही नेहमीचंच ......
"रागावलीस.....चिडलीस माझ्यावर...??"
तुझं विचारणं.....
"नाही रे....तुझ्यावर कशाला रागावेन..."
असं म्हणत माझं डोळ्यातलं पाणी टिपणं...
हळूच सोडलेला सुस्कारा नकळत मला कळतोच..
दुखावलेली असतानाही हासणं मला जमतंच...
तूझ्यावर रागावून कुठे जाणार...
प्रत्येक वळणावर तूच भेटणार..

पण अश्यावेळी...
तूझ्या प्रेमाच्या वर्षावात भीजताना....
आत कुठेतरी एक कोपरा कोरडाच रहातो...
नंतर माझ्याच अश्रूंनी भिजवण्यासाठी...

पण बघ....जप मला....
इतकाही पाहू नकोस अंत ....
मी होईपर्यंत....कोरडीठक्क...!!



-----चैताली.

07 October 2009

क्रमप्राप्त..........!!

क्रमप्राप्तच होतं सारं...
ठार मेलेले आश्वास....
आणि अर्धमेले श्वास..
वाहत होते स्वप्नांची कलेवरं.....
असह्य झालेली....
कानांचे पडदे फाडणारी शांतता...
त्याचवेळी अश्रूंनी घेतलेली संथा...
मनाच्या शैथिल्यावर मात करणारे...
उरलेल्या निर्माल्याचे शल्य..

उदासिन पायरव आणि नयन अनिमिष...
उद्धृत क्षण आणि अर्धवट अभिलेख...
आता साथ देणार ...अंतापर्यंत...!!
बोठट शस्त्रानेही भेदरलेली [भेदलेली??]कातडी....
अन पिळवटून तुटलेली आतडी....
संथ लाटांखाली...पुन्हा...[का?]
शिष्ठ,क्लिष्ट मंथन...
अंतहिन वागवावे लागणारे...
हलाहलाचे लांच्छन....
अन मर्त्यालाही...
जगण्याचे बंधन!!....


---चैताली.

17 September 2009

गोठणं..थंडाळणं.....!!!

पुन्हा गोठणं....
पुन्हा थंडाळणं....
अस्वस्थता अंगावर घेवून निपचित पडून रहाणं.....!!
जमल्यास धावत सुटणं....
विचारांचे पेटते पलिते घेवून....!!!
तरीही फारसं काही होत नाही...
आधीसारखं उधाणून येत नाही....
मग उबाऱ्याची आस असलेले श्वास...
विचारांप्रमाणेच अस्ताव्यस्त होतात...
अचानक....
इतकावेळ साथ देणाऱ्या...
विचारांच्या सावल्याही पसार होतात ........
डोळ्यातलया बाहूल्या धुसर होतात ...

मग ओठ बोलतात ...जुजबी ....
अन....
अश्रू मात्र रडतात.......
हुकूमी .....!!!



----चैताली.