Translate

06 May 2010

स्वप्नाळले.....!!

गुंतले तुझ्यात....
तुझ्यात भुलले...
मिळवण्या तुला...
वेडावले.....!!


मदीर श्वासात...
श्वासात भिनले..
समेटता तुला...
सुखावले.....!!


जपले मनात...
मनात गुंजले...
गुपित आपुले...
उसासले.....!!


घे ना जवळी ...
जवळी राहुदे.. ...
आठवात तुझ्या
स्वप्नाळले.....!!



----चैताली.

26 April 2010

नूरलेच मी....!!

पुन्हा एकदा....
झाले बावरी....
तुझ्या भासांनी....

धावले मग...
विस्कटल्या....
रुद्ध श्वासांनी......!

विरघळले...
वळणातल्या....
रम्य वाटांनी.....

भानावले मी....
मग उजाड....
भग्न रस्त्यांनी.....!

आतापर्यंत...
भिस्तच होती....
त्या शब्दांवर...

राहिले काय...
माजले फक्त...
अवडंबर.....!

वाटते आता....
न स्फ़ुरले मी....
विरलेच मी...

स्वप्नात तुझ्या...(अन्‌)
जीवनी माझ्या...
नूरलेच मी....!!



-----चैताली.

22 March 2010

राहूदे तुझ्याकडे.....!

आहे तरी काय माझ्या कवितेत...
काही काटेरी धुमारे...
काही चटके... विझते निखारे...
राखभर विस्तव....
अन निखालस कटू वास्तव...

पसाभर चांदण्या....
हिरमुसला चंद्र....
एखाद्या ढगाची उसनी सावली..
जी उगाचच...
सैरभैर आभाळभर धावली....

तरीही काही कविता....
राहूदे तुझ्याकडे.....
काही मनाशी ठेव जपून...
अन काही अंगणात ठेव पुरून.....!

जास्त काही लागणारच नाही...
एखाद्यादिवशी मनात झुरशील...
असतील-नसतील तेवढे उमाळे लपवशील...
दिसलंच तर जप डोळाभर..
माझं ओलं मन...

पाकळीही उमलणार नाही...
वाढेल कदाचित तुझ्या अंगणात....
फक्त ..फक्त खुरटं तण.....!!




---चैताली.

02 March 2010

अंगभूत वळणं..!!

तुलाही मी तशीच हवीय ना...

तुझ्या साच्यात ढाळलेली...

पण मग माझा कोरीवपणा....??

नसा-नसात भिनलेला ठाशीवपणा...??

कशी विसरू...

माझ्यात भिनलेली भिन्नतेची लय...

माझं माझ्याचभोवती असलेलं बिलोरी वलय...

तुला आवडतं ना....

तुझ्या डोळ्यात माझं विरणं....

माझं तुझ्यातलं डोलणं..

पण मग कसं थांबवू...

विचारांच्या झोक्याची दोलनं..

अंगाखांद्यावर आत्ता-आत्तापर्यंत...

मिरवलेलं ’स्व’त्वाचं लेणं......

तशीही मी तुझीच आहे रे..

पण मग...

कुठे अडगळीत नेवून टाकू...??

साधी-सरळ असली तरीही..

माझी... 'माझी'...

अंगभूत वळणं..!!

                         ---चैताली.

15 February 2010

नभनक्षी

कड्याशी...
हवा समुद्राळलेली...
सुर्याची...
ऊब आता डूबलेली...


किंचित....
ढग जरा रेललेला....
ओळीत...
पक्षी एक चुकलेला..


भरती....
सांजेला तूझ्या सयीची...
उरली...
नभनक्षी आठवांची...


सांभाळ.....
तुच वेड्या ह्या जीवाला...
आभाळ...
तुच माझ्या समुद्राला....!!



--चैताली.

06 January 2010

अस्सं झालंय झाड माझं.....
पानोपानी बहरलेलं...
उमलता-उमलता डवरलेलं....
उगाचंच बावरलेलं...

हात हाती घेता...
मन लागले नाचू....
स्पर्शात अशी तुझ्या...
काय आहे जादू...
कळी-कळीने आता...
स्वप्नं नवं ल्यायलेलं..
अस्सं झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं... ॥१॥


ओठांवर माझ्या...
खट्याळ तूझे हासू...
मी तूझीच.. तू माझा...
नको ना असा रुसू...
थरारल्या मना...
आताच सावरलेलं...
अस्सं झालंय झाड माझं..
पानोपानी बहरलेलं... ॥२॥


आताशा मी जरा...
सावरून रहाते...
फूलले मी तरीही...
सुगंध आवरून घेते...
सळसळ पानांना ...
कितीदा रागावलेलं...
असां झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं.... ॥३॥



---चैताली.

एक परी.........

In my dreams....
वाऱ्यावरी...
आली एक परी...वाऱ्यावरी...
मन माझे घेवून गेली....
मनात ती..तनात ती..
आहे का खरी....सांग तरी...!!
एक परी......एक परी...!!


In one glimpse......
झाली चोरी....
हृदयाची माझ्या...झाली चोरी....
जीवन नवे देवून गेली...
श्वासात ती....भासात ती....
शोधू आता तिला...कुठवरी..!!
एक परी.........

Don't leave me...
वाटेवरी....
सोडू नको अर्ध्या...वाटेवरी....
चालतील ना बहाणे..
हसण्यात तू...गाण्यात तू....
बोल ना..बोल....काहीतरी....!!
माझी परी....


----चैताली.