Translate

30 April 2011

उन्हं....!!

आताशा....
सहन होत नाहीत ही पिंजारलेली उन्हं....
त्यात दबक्या पावलांनी....
सावल्यांनीही पसार होणं....

सावरत बसते भर दुपारी मग...
जगण्याच्या रिकाम्या चौकटी...
अन भयाण हसतात त्यातली...
स्वप्नं एकटी-दुकटी....!

वाटतं....
हे सर्व तुला कळावं.....
माझं आत-आत जाणं...
खोल तुझ्यात घुसावं...

नाहीच पोहोचले तर....
अशी उन्हाळताना....
एकदाच जीव गोळा करेन....
डोळ्यांत साठवून तुला....
जगणं उधळून देईन...!!



                ---- चैताली.

21 November 2010

.. आभाळ विसरले नाहीच मी.... !

.... आभाळ विसरले नाहीच मी....
नभ जरा पांगले एवढंच.....
क्षितिजावरच पंख पसरले .....
त्या निळाईने नादावले एवढंच....
आता सडा -रांगोळी घालताना....
नक्षत्र चितारीत नाही मी...
धरतीशीच कुजबुजते एवढंच....
बाहेर तर केव्हाच पडलेय मी...
खोल..आत रुजते एवढंच.....

बरसणं....नभ होवून झुरणं....
सारं सारं आहे लक्षात....
आता शब्द विरलेत एवढंच....

अश्याने मी तरी कोसळेन किंवा कविता तरी.... ...
 अखेर दोन्ही प्रकार एकच... !!!

                  ----चैताली.

11 October 2010

स्वप्नं......

तु म्हणालास थांब.....
थांबले मी क्षणभर....पाय ठरत नव्हते तरी....
दिर्घ श्वास घेवुन... आरश्यात बघीतलं...
तर तिथेही...स्वप्नंच दिसली उरावर नाचणारी...
आणि श्वासालाही दरवळ स्वप्नांचा... तुझ्या नी माझ्या...!

परत म्हणशील सांगितलं नाहीस...
माझ्या स्वप्नांत अडकू नकोस रे.... फडफडशील...
माझ्या स्वप्नांसाठी झुरु नकोस...
माझी स्वप्नं म्हणजे निव्वळ फसवणुक...
फक्त लटकत्या भावनांची तटवणुक...

आकाशही हातात आलं रे!
पण त्यालाही एकच रंग करडा...
मनात होतं रंगीत कारंजं... फुलपाखरी..
च्चं! माझी स्वप्नंच रे काहीच्या- बाही...
पण सुन्नाट घोरण्यापेक्षा ती बरी....!

तरीही ती राज्यं मला खुणावतात...
येवून अंगोपांगी भिनतात...
विषवल्लीच ती..... अन् मी शापित राजकुमारी...
अभिशाप अहे मला स्वप्नांचा....
ह्या स्वप्नातून त्या स्वप्नात... फिरण्याचा...!!!

----- चैताली.

28 September 2010

......वाटतं....!!

वाटतं...
चालत जावं....
आकाशाच्या भिंती ओलांडून....
नसलेलं असलेपण पाठंगूळी मारून....

वाटतं....
विखरून जावं....
भोवतालचं भवंडलेपण...
उद्धृत वाटांच्या माथी मारून...

वाटतं...
कधी न कळावं....
नगण्य व्यवहारीपणाच्या...
शून्याचे घरंगळलेपण....

वाटतं....
कधी न कळावी...
वर्दळीची भाषा....
अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!


          ----चैताली.

20 September 2010

........सवाल तत्त्वांचा!!!


खरं कोणाला पटत नाही....
आणि खोटं मी बोलत नाही...
तत्त्वातंच बसत नाही ते माझ्या...
तत्त्वं-बित्त्वं फार मानते मी,
मात्र कुबड्या नाहियेत त्या माझ्या,
म्हणुनच अजुनही दमदारपणे पाउल टाकतेय.....
उगाळते त्यांना अधुन-मधुन आणि फासते जगण्याला...
तत्त्वांच्या पॅरामीटरखाली मोजते लोकांना!

पण कधी-कधी वाटतं....प्रातिनिधिक शब्दांचे ...
बुडबुडे तर नाहीत ना..... माझी तत्त्वं?
दयावं का त्यांना एवढं महत्त्वं ...
स्वत:च लादलेलं असामान्यत्व??
जाउन बसतात मुळांशी आपल्या भेगांमधील मातीसारखी....
लिंपा नाहीतर खरवडून काढा !!
तत्त्वं असावीत पारदर्शक.. डोळ्यांतल्या लेन्ससारखी...
दिसुनही येत नाही घातलीये म्हणून.. आणि स्पष्टही दिसतं...
धुळीपासुन जपावं लागतं मात्रं..... अहंकाराच्या!
हं! आणि घालून "झोपताही येत नाही"......

तत्त्वं पाळणारंच मी...
पण दावणीला नाही बांधणार...
गुलामही नाही बनणार त्यांची....
राज्यंच करायला लागली माझ्यावर ती तर......

बासनात गुंडाळून ठेवीन........ नि:संशय!!!!!!!


------- चैताली.

17 September 2010

सांग न सखया..

रडले परि...
भिजले न थेंबभर...
....
बोलले परि...
उमटले न कणभर...
....
सांग न सखया...
कुठेशी घेऊन जाऊ...
शब्दांचे अवडंबर....!


उमलले परि...
गंधाळले न पाकळीभर....
....
स्वप्नाळले परि...
निजले न पापणीभर...
.....
सांग ना सखया...
कुठेशी घेऊन जाऊ...
चांदणं आभाळभर...!


तेवले परि...
उजळले न ज्योतभर..
....
चालले परि...
पोहोचले न पाऊलभर...!
....
सांग न सखया..
कुठेशी निघून जाऊ...
वाटाच आंगणभर...!

            -------- चैताली.