Translate

18 October 2013

गिरक्या



भिर भिर गिरक्या घेऊन...
अलगदलेलं आल्हाद शरीर...
ती काळ्या कातळावर
आकाशाखाली आंथरते...

तेव्हा काही उरत नाही...
स्थळ काळ आयाम मिती...
ना कसली क्षिती...

सारं काही गौण...

आणि बस्स...
अचल..अपलक ती...!!

...चैताली.

27 September 2013

माणूसजात ...!!



शेवटी काय तर..

दुरुस्त अंतरावर राहून...

आपापल्या टेकड्यांवर बसून..

मानव्याचे दाखले देत....

माणूसपणाची शिस्तशीर उस्तवार करणारी..

तुझी माझी ..ह्याची तिची.. त्यांची..आपली..

एकच...स्वत:पुरती जगणारी...

स्साली माणूसजात ...!!

...चैताली.

इथला प्रत्येक आकार...


इथला प्रत्येक आकार...

प्रत्येक देह अनोळखी..

तिथला प्रत्येक देह साकार...

साक्षात ओळखी...



इथले रस्ते,

शहरं निवासी...

तिथली झाडं,नद्या..

जणू मीच अशारीरी..



इथले आवाज..बेवाजवी..

तिथली कमानशीर खळखळ...

माझ्यात गहिरी...



इथे संवाद निर्जीव वास्तववादी..

तिथली पेशी न पेशी..

अशारीर..अप्रत्यंची...!!


(तिथली म्हणजे कुठली??)

        
 ...चैताली.

Is it ok to feel lost on the eve of ur so called birthday..??


29 August 2013

Ship of Theseus

शरीराची खोळ करावी...
आणि सगळं भरावं त्यात..
झाडं,नद्या,समुद्र.....
(म्हणजे एकदम Ship of Theseus की काय ते आपण)

मग थोडासा वारा डोळयांना...
कपाळाला माती फासायची..
तेव्हा कुठे पाय रुजतील जमिनीत..

आकाश तेवढं राहू द्यायचं डोक्यावर...
म्हणजे पृथ्वीची शाई पसरेल अंगावर..
आणि उल्हाळतं रक्त होऊन जाईल..
.......हिरवंनिळंशार......!

......चैताली.

29 July 2013

चालो बे ..!






खांद्यावरचं ओझं तसं नेहमीचंच...

सुरवातीला कोण अप्रूप त्याचं..

मग कुतूहल...

आणि आता सवय..



सारं सारं गच्च दाबून बसवते त्यात..

वाटतं एकदाचं overflow होईल ते..

फसफसून रिकामं होईल..

म्हणून चेहऱ्यावर...

लकेरसुद्धा उमटू देत नाही त्याची...

brainless हृदयाचं मेंदूपर्यंत काहीही पोहोचू देत नाही..(सहसा!)



मग खूप चालते..खूप चालते...

येतंच लक्षात...

त्या ओझ्याला जगणं असंही म्हणतात..

चालो बे... चालो बे ..!



    ----चैताली.

24 July 2013

गाठ

तू म्हणालास...
"गाठ मारून ठेवली आहेस स्वत:ला..."
कोणी तरी माहित असलेलं सांगितल्यावर....
हसतो आपण... तशी हसले...

त्या गाठी अलीकडची मी....
पलीकडची मी...
अन मला विभागणारी गाठ...!

मारलेल्या गाठी दिसतात..
सुटलेल्या नाहीच...

गुंता होण्याऐवजी
गाठीला एखादी
गाठ असलेली बरी.. नाही का....!

....चैताली.

बेफिकीर

मग माझ्या कवितांना काय म्हणायचं...??
त्या तर तश्याही...
कोणाच्याच कोणी लागत नाहीत...

मी डोंगरवाटा निथळून टाकते अंगाखांद्यावरून..
झाडांचे ठसे मिरवते अष्टांगी...
माझ्या(??) कविता उगवतात त्या ठश्यांमधून..

एखादं पान क्वचित...
माझं नातं सांगेल शब्दांशी...
बाकी त्याही बेफिकीर..
फकीरासारख्या...!!!

.....चैताली.